नवी दिल्ली : जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय. पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना WHO मान्यताप्राप्त लस हा महत्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे.
देशाबाहेर प्रवास करु इच्छिणारे भारतीय को-वॅक्सिन पेक्षा कोविशील्ड लसीच्या शोधात आहेत. कुठलीही लस घ्या, परिणामकारता सारखीच असं देशाचं आरोग्यमंत्रालय सांगत असतानाही असं का होतंय तर याचं कारण को-वॅक्सिन जागतिक आरोग्य संघटनेनं मान्य केलेल्या लसींच्या यादीत अजून समाविष्ट नाही.त्याचमुळे अनेक देश केवळ कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देतायत. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली बनतेय, आणि त्यात मान्यताप्राप्त लस घेतलेल्यांनाच प्रवेश असा नियम अनेक देशांनी लागू केलाय, काही त्या तयारीत आहेत.
एरवी देशाबाहेर जायचं तर पासपोर्ट- व्हिसा आवश्यक असतो. पण कोरोनामुळे जीवनशैलीत जे अनेक बदल आणले त्यात आता याही गोष्टीचा समावेश झालाय. कारण तुम्ही कुठली लस घेतलीय यावरच तुम्हाला त्या देशात प्रवेश मिळणार की नाही हे ठरतं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सीरमची कोविशील्ड, मॉडेर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, सायनोफार्मसारख्या लसींचा समावेश आहे. पण कोवॅक्सिन मात्र यादीत नाहीय.
कुठल्या लसीला देशात परवानगी द्यायची हा संपूर्णपणे त्या देशाचा अधिकार आहे. को-वॅक्सिन हैदराबादच्या भारत बायोटेक आणि आयसीएमआरनं संयुक्तपणे विकसित केली आहे. भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकानी जानेवारीतच परवानगी दिली. जागतिक आरोग्य संघटनेकडे कोवॅक्सिनच्या मान्यतेचा अर्ज अजून प्रलंबित आहे. मे-जूनमध्येच याबाबतची एक प्राथमिक बैठक पार पडेल. त्यानंतर या लसीबाबतची सगळी कागदपत्रं, पुरावे सादर होऊन जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचा निर्णय घेईल.
आंतरराष्ट्रीय प्रवासात मान्यताप्राप्त लसींबाबत जे नियम होतायत, त्याचा सर्वाधिक परिणाम परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतोय..ऑगस्टच्या दरम्यान या विद्यार्थ्याचं नवं शैक्षणिक वर्ष सुरु होतं. त्यामुळे आत्तापासूनच त्यांना प्रवासाची तयारी करणं आवश्यक आहे. पण भारतात कोवीशिल्ड ऐवजी को-वॅक्सिन लस घेतलेल्यांना डब्लुएचओची परवानगी मिळेपर्यंत प्रवासात अडचणी येऊ शकतात.
अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत लसीकरण आवश्यक केलं आहे. एकतर त्यांच्या देशानं स्वत: विकसित केलेल्या लसी किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत असलेल्या लसीच ग्राह्य धरल्या जातायत. कोवॅक्सिन ही लस भारतानं अनेक देशांमध्ये निर्यातही केलीय. पण आत्तापर्यंत केवळ 10 पेक्षा कमी देशांनीच प्रवासाच्या परवानगीसाठी ही लस ग्राह्य धरलीय. ज्यात नेपाळ, मॉरिशस, फिलीपीन्स, इराण, मेक्सिको, गयाना, पॅराग्वे, झिम्बाब्वे फिलीपीन्स या देशांचा तूर्तास समावेश आहे. त्यामुळे आता इतर देशांमध्ये स्वतंत्रपणे निर्णय होतायत का आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत को-वॅक्सिन कधी येते हे पाहावं लागेल.