मुंबई : आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्टलाईन कर्मचाऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. यादरम्यान त्यांनी मृतांना श्रद्धांजलीही वाहिली. मोदींच्या संबोधनानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आपण मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. देशातील कोरोना स्थितीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी ट्वीव्हवर येऊन रडतील, असं वक्तव्य संजय सिंह यांनी महिन्याभरापूर्वी केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आता खरं ठरलं आहे.


संजय सिंह यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "17 एप्रिल रोजी मी सांगितलं होतं आणि 21 मे रोजी ते प्रत्यक्षात घडलं. देशाला एक संवेदनशील प्रामाणिक मनाचा व्यक्ती हवा आहे, ढोंगी पंतप्रधान नाही जो स्वत: सभा घेऊन कोरोना पसरवतो आणि नंतर रडण्याचं नाटक करतो." या ट्वीटमध्येच संजय सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक होण्याची शक्यता वर्तवली होती. 






आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संजय सिंह पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत आहेत की, "तुम्ही थोडी प्रतिक्षा करा. लाईट कॅमेरा अॅक्शन सुरु होणार आहे. थोडी वाट पाहा, ते टीव्हीवर येऊन रडणार आणि संपूर्ण देशातील चॅनलवर ते दाखवलं जाईल. सर्व भावूक झाले..सर्व रडू लागले. केवळ टाळ्या, थाळ्या वाजवा. खरंच जर देशाचं भलं करायचं असेल तर या गोष्टींमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल."



"आपला हा व्हिडीओ 17 एप्रिलाचाच असून त्यांनी तेव्हाच पंतप्रधान मोदी भावूक होण्याची भविष्यवाणी केली होती," असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.


संजय सिंह यांच्यासह बऱ्याच लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अश्रू नाटकी असल्याचं म्हटलं आहे. निवृत्त आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. सूर्य प्रताप सिंह यांनी ट्वीट करताना लिहिलं आहे की, मोदीजी जेव्हा लोकांचा जीव जात होता, तेव्हा तुम्ही बंगालमध्ये "दीदी ओ दीदी" बोलत होता. गर्दी पाहून उत्साहित होत होता, आता तुमचं हे खोटं सांत्वन आणि खोटे अश्रू देशाला चांगल्या प्रकारे कळतात. 


पंतप्रधान काय म्हणाले होते?
आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्ट लाईन कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले होते की "मी काशीचा सेवक असल्याच्या नात्याने काशीनिवासींचे सहृदय आभार मानतो. कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक यांनी जे काम या काळात केलं आहे ते प्रशंसनीय आहे." जवळच्या अनेकांनाच आपण या काळात गमावलं आहे असं म्हणताना पंतप्रधानांना त्यांच्या मनातील भावनांना आळा घालणं कठीण झालं आणि ते भावूक झाले.