नवी दिल्ली : देशात कोरोनासोबत आता ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे. त्यावर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. देशात ब्लॅक फंगसचा समावेश आयुष्यमान भारत योजनेत करावा आणि त्यावर मोफत उपचार व्हावेत अशी मागणी त्या पत्रातून सोनिया गांधींनी पंतप्रधानांकडे केली आहे. 


केंद्राने सर्व राज्यांना ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा असं आवाहन केलं आहे. त्याचा उल्लेख करुन सोनिया गांधी यांनी लिहिलंय की, ब्लॅक फंगसला महामारी घोषित केल्यास त्याच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व औषधांचा पुरवठा करणे आणि त्याच्या उत्पादनाची निश्चिती करणं आवश्यक आहे. तसेच या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जावेत. यासाठी आता केंद्र सरकारने तात्काळ पाऊलं उचलायला हवीत. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ब्लॅक फंगसला एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट, 1897 अन्वये महामारी जाहीर करावं असं आवाहन सर्व राज्यांना केलं होतं. केंद्रीय मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये, खासकरुन ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचं सांगितलं होतं. ब्लॅक फंगसच्या रुग्णांसंबंधी सर्व माहिती रुग्णालयांनी आणि त्या-त्या राज्यांनी देणं बंधणकारक असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 


केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे. या तीन राज्यांनी आणि एका केद्रशासित प्रदेशाने गुरुवारी तसं जाहीर केलं.  तेलंगणा आणि राजस्थान या दोन राज्यांनी ही निर्णय आधीच घेतला आहे. 


सोनिया गांधींनी या आधी गुरुवारी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या मुलांनी कोरोनामुळे आपले आई-वडील वा यापैकी कोणी एक गमावलं असेल त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून करावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधानाना केली होती. त्या आधीही सोनिया गांधींनी पंतप्रधानांना वेळोवेळी पत्रं लिहून सूचना केल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :