नवी दिल्ली: श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर मुलीसह ताब्यात घेतलेले मेजल लितुल गोगोई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. आर्मी कोर्टाने त्यांना ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी धरलं आहे. याशिवाय आदेशांना न जुमनता स्थानिकांशी जवळीक साधण्यालाचाही आरोप त्यांच्यावर आहे.

भारतीय सैन्यदलात मेजर या पदावर कार्यरत असलेले लितुल गोगोई यांना, 23 मे रोजी श्रीनगरमधील ग्रँड ममता या हॉटेलमधून कथितरित्या बडगाममधील एका मुलीसह ताब्यात घेतलं होतं. याप्रकारानंतर सैन्य दलाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.

मेजर गोगोई कथितरित्या स्थानिक तरुणीसह हॉटेलमध्ये जाऊ इच्छित होते. त्यावरुन वाद झाला होता. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने पोलिसांना बोलावलं होतं.

पोलिसांनी मेजर गोगोई आणि तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आयजीपींनी याप्रकरणाचा तपास श्रीनगर झोनचे पोलीस अधीक्षक सज्जाद शाह यांच्याकडे दिला होता. तर गोगोईंना सेनेच्या बडगाम युनिटमध्ये परत पाठवलं होतं.

कोण आहेत मेजर गोगोई?

मेजर लितुल गोगोई हे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून  चर्चेत आहेत. श्रीनगरमध्ये स्थानिकांकडून जवानांवर होणारे हल्ले नवे नाहीत. गेल्या वर्षी 9 एप्रिललाही जवानांच्या ताफ्यावर काश्मिरी तरुणांनी घेरलं होतं.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये, यासाठी मेजर गोगईंनी त्यावेळी  नामी उपाय शोधला होता. जवानांच्या गाड्यांना 400 काश्मिरी तरुणांनी घेरलं होतं. या परिस्थितीत दगडफेक होऊ नये, यासाठी जवानांनी एका काश्मिरी तरुणालाच जीपवर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला.

या प्रकारानंतर मेजर गोगोई यांचा भारतीय सैन्यदलाकडून सत्कार करण्यात आला होता. तसंच दगडफेकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी काश्मीरी तरुणाला ढाल बनवणारे मेजर लितुल गोगोई यांचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केलं होतं. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोगोईंच्या कृतीचं समर्थन करताना मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती.

संबंधित बातम्या 

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार  

मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही : लष्करप्रमुख