नवी दिल्ली :  हॉटेलमधील एका खोलीत तरूण जोडप्याने एका भांड्यात होम हवन करत लग्नविधी पार पाडला. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांच्या लग्नाला अवैध ठरवत दाम्पत्याला 25,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. 


 महिला 20  वर्षाची असून मुलगा 19 वर्षे 5 महिन्याचा आहे. दोघांनी विवाहानंतर आपल्या नातेवाईकांच्या भीतीपोटी  आणि आपल्या वैवाहिक आयुष्याच्या सुरक्षतेसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला . कारण दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे दाम्पत्याने पळून जाऊन 26 सप्टेंबरला हॉटेलच्या खोलीत विवाह केला. परंतु त्यांच्या विवाहावेळी कोणीही उपस्थित नव्हते किंवा त्यांच्याकडे लग्नाचे प्रमाणपत्र देखील नाही. त्यामुळे न्यायालयासमोर पुरावा म्हणून  लग्न झाल्याचा फोटो देखील नाही. 



कोर्टासमोर जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या कुटुंबियांचा या जोडप्याच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे या जोडप्याने हॉटेलमधील एका खोलीत विवाह केला. मुलाने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे एका भांड्यात होम करत अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेण्याअगोदर कुंकू लावले आणि त्यानंतर ऐकमेकांना हार घेतले.  परंतु या वेळी कोणत्याही मंत्राचे पठण केले नाही.



 विवाहासाठी मुलाचे वय कमी होते. तसेच जोडप्याने कोर्टाला खोटी माहिती दिली. कोर्टाने सांगितले की, जोडप्याने अर्धवट माहिती दिली असून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे.  मुलाचे वय कमी असल्याने जोडप्याचा विवाह अवैध आहे. न्यायालयात खोटी माहिती सादर  करत न्यायालयाचा अमूल्य वेळ घालवला आहे. त्यामुळे न्यायलयाने जोडप्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.


दरम्याना कोर्टाने पंचकुला पोलिस आयुक्तांना जोडप्याला सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले आहे. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे.