नवी दिल्ली :  देशामध्ये कोरोना व्हायरस फोफावत आहे. देशामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. भारतामध्ये आज आणखी 13 नवे रूग्ण आढळून आले आहेत. याचसोबत देशामध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 236 वर पोहोचली आहे. या लोकांमध्ये 191 भारतीय आणि 32 परदेशी लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून कोरोना बाधितांची संख्या सध्या 52वर पोहोचली आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे.


कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रूग्ण


आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रामध्ये या जीवघेण्या विषाणूचे सर्वाधिक 52 रूग्ण आहेत. यामध्ये तीन परदेशी लोकांचा समावेश आहे. यानंतर केरळमध्ये 28 संसर्गजन्य लोक असून दोन विदेशी नागरिक आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये 22, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, दिल्लीमध्ये 17, लदाखमध्ये 10, तेलंगणामध्ये 17, राजस्थानमध्ये 1, जम्मू काश्मिरमध्ये चार, तमिळनाडूमध्ये 3, ओडीशामध्ये 2, पंजाबमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 3. आंध्रप्रदेशमध्ये 3, बंगालमध्ये 3, चंदिगढमध्ये एक, पद्दुचेरीमध्ये एक, गुजरातमध्ये 5 आणि छत्तीसगढमध्ये एक कोरोनाग्रस्त आहे.


पाहा व्हिडीओ : महानगरं बंद! महाराष्ट्रातील महानगरं आज रात्रीपासून पूर्णपणे बंद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा



आतापर्यंत कोरोनामुळे किती जणांचा मृत्यू?


कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी 13 मार्चला कर्नाटकातील कुलबुर्गी येथे 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ही व्यक्ती सौदी अरब येथून परतली होती. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग दिल्लीतील 68 वर्षीय महिलेला झाला होता. तिचा 17 मार्च रोजी मृत्यू झाला. तर 19 मार्चला पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.


इटलीला जाणार विशेष विमान


एअर इंडियाचं विशेष विमान इटलीला पाठवण्यात येणार आहे. इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. विशेष विमान आज रवाना होणार असून 22 मार्चला पुन्हा भारतात परतणार आहे.


Coronavirus | गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारहून अधिक रुग्ण, 1354 जणांचा मृत्यू


रविवारी भारतात 'जनता कर्फ्यु'


कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.


संबंधित बातम्या : 


#JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा 


Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क


coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती