नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 11 लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. आज तमिळनाडूतील मदुरईमद्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काल मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 476 भारतीय नागरिक आहेत, तर 43 विदेशी नागरिक आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे, आतापर्यंत 40 जणांना कोरोनामुक्त करण्यास यश आलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बोलताना त्यांनी सांगितले की, 'कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


मागील 40 तासांमद्ये एकही नवा रूग्ण नाही : केजरीवाल


मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली की, मागील 40 तासांमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण दिसला नाही. दरम्यान, काल एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केजरीवाल यांनी सांगितल्यानुसार, दिल्लीमधील 30 रूग्णांपैकी काही रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.


पाहा व्हिडीओ : रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन :नरेंद्र मोदी



हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरला 15 हजार कोटींचं पॅकेज


नरेंद्र मोदी यांनी काल जनतेशी संवाद साधला त्यादरम्यान, सोशल डिस्टेंसिंगबाबत त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देशाच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरला आणखी मजबुत करण्यासाठी 15 कोटी रूपये दिले आहेत.


मुंबईत कोरोनाचा चौथा बळी

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी गेला आहे. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. मृत व्यक्तीला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून सर्वाधिक 107 कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. तर चार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.


संबंधित बातम्या : 


India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा


India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी


पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख


परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे