नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट पुढे ठाकलं आहे. हा कोरोना व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं.

यावेळी नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला कोरोनाची नवीन परिभाषा सांगितली आहे. कोरोना म्हणजे

को - को

रो - रोडपर

ना - ना निकले

याचाच अर्थ कोरोना व्हायरससारख्या महारोगाला हरवायचं असल्यास कोणीही रस्त्यावर जाऊ नका. कोरोना व्हायरससारख्या महारोगाचा संसर्ग टाळायचा असल्यास आपल्याला कोरोनाबाधितांच्या संपर्कात येण्याची साखळी तोडण्याची गरज आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले, प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्याला हे लक्षात आले नाही तर आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीही नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. 18 मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मोदींनी देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं होतं. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे, तसेच याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील मोदींनी केलं होतं.