अलाहाबाद हायकोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोग सक्रिय; उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेणार
Postpone UP Election : उच्च न्यायालयानं फटाकारल्यानंतर निवडणूक आयोग सक्रिय झालं असून उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
Postpone UP Election : कोविड, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रॅलींवर तात्काळ बंदी घालण्याची आणि विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीनंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोग पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. यासंदर्भात सीईसी सुशील चंद्रा यांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली. "पुढच्या आठवड्यात आम्ही यूपीला जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ", असं ते म्हणाले.
दरम्यान, उच्च न्यायालयाने इशारा दिला आहे की, परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा वाईट होऊ शकते. तसेच, ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी, अशी सूचना केली होती. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
योगी सरकारनं लागू केलं निर्बंध
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या दहशतीत योगी सरकारनं मोठी निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच लग्नसोहळे, कार्यक्रमांना कोरोना नियमांचं पालन करुन 200 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचेही निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
देशातील विविध राज्यांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत 25 डिसेंबरपासून राज्यात रात्रीचा कर्फ्यु लागू होणार आहे. दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू असेल.
उत्तर प्रदेश निवडणूका टळणार?
ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरु होती. यादरम्यान कोर्टातील गर्दी पाहून पंतप्रधान मोदींना, असं आवाहन करण्यात आलं आहे.