नवी दिल्ली : रा्ज्यात आणि देशात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या दुसर्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. पुढील चार आठवडे आपल्यासाठी खूप कठीण आहेत.
भारतात कोविड संसर्गाची तीव्रता वाढली आहे. गेल्या वेळीपेक्षा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. सर्व वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्याच्या मागणीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की ज्यांना आवश्यक आहे त्यांना लस दिली जात आहे. प्रत्येक देशात लस अधिक धोका असलेल्या वयोगटाला दिली जात आहे, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.
Corona | महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसाठी 50 केंद्रीय पथकं, एकट्या महाराष्ट्रात 30 पथकं दाखल
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं की, लसीकरण होते तेव्हा लोकांना मृत्यूपासून वाचवण्याचा उद्देश असतो. दुसरं म्हणजे आरोग्य सेवा दुरुस्त करावी लागेल. या दोन्ही गोष्टी लक्षात घेत भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह सर्व देशांमध्ये लस दिली जात आहे. ब्रिटनमध्ये आजही सर्वांना लस दिली जात नाहीये. अमेरिकेतही लस वयानुसार दिली गेली आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा धोका अधिक असलेल्या 50 वर्षांवरील लोकांना लस दिली जाणार आहे. स्वीडनमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. काल देशभरात 43 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. यासह आज सकाळपर्यंत देशात आतापर्यंत 8 कोटी 31 लाख डोस दिले गेले आहेत.
Coronavirus In India | भारतात कोरोनाचा उद्रेक का होतोय? केंद्र सरकारचे काही अनुमान
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्राल एक पत्र लिहिले होते. केजरीवाल यांनी कोरोना लस सर्व वयोगटातील लोकांना द्यावी अशी मागणी केली होती. तर 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोरोनाची लस द्यावी, असं उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ट्वीट करून अशीच मागणी केली होती. सध्या कोरोनाची लस 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना दिली जात आहे.
आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 96 हजार 982 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. यानंतर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 049 वर गेली. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 65 हजार 547 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.