नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरस महामारीचं संकट सर्वोच्च पातळीवर जाऊन आलं आहे आणि आणि कोरोनाचं संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावर सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा आहे की, कोरोना महामारी फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या माहिती या समितीने म्हटलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत.
लॉकडाऊन नसतं तर 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते
सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. आयआयटी हैदराबादचे प्रमुख विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या मते, जर मार्चमध्ये भारताने लॉकडाऊन लागू केले नसते तर देशभरात 25 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. आतापर्यंत या साथीच्या आजारामुळे 1 लाख 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम
निती आयोगाचे सदस्य आणि कोविड तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांत नवीन कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यूंचं घटलं आहे. मात्र हिवाळ्यात भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची लस एकदा आली की ती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. भारत आता चांगल्या स्थितीत आला आहे, परंतु अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. कारण 90 टक्के लोकांना आताही कोरोनाची लागण सहज होऊ शकते.
भारतातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत सतत घट होत असल्याची नोंद झाली असुन सलग दुसऱ्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे 7,83,311इतकी आढळली. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एकूण पॉझिटीव्ह रूग्णांच्या 10.45 टक्के इतकी आहे. आतापर्यंत एकूण 65,97,209 रूग्ण बरे झाले आहेत. मुक्त होणाऱ्या तसेच सक्रीय रूग्ण संख्येतील अंतर वाढून 58 लाखांच्या (58,13,898 )वर गेले आहे .देशात रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता तो 88.03 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 72,614 कोविड रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर 61,871नवीन रूग्ण आढळले आहेत. नवीन बरे झालेल्या रूग्णांपैकी 79%रूग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात एकत्रित आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवशी, 14000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून, रूग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.