नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक महत्वाचं विधान केलंय. यासह महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरही त्यांनी टिपण्णी केलीय. बिहारमध्ये भाजपच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असणार आहेत असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.


कारण बिहारमध्ये नेमकं कोण कुणाशी लढतंय हे कळत नाहीय. वरुन युती एका पक्षाशी आणि जास्त जागा पटकावण्यासाठी आतून दुसऱ्याच पक्षाशी संधान अशी काहीशी स्थिती आहे. म्हणजे भाजप आणि नितीशकुमार एकत्र लढतायत. पण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत असलेले चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतायत. चिराग यांचे बहुतांश उमेदवार हे जेडीयूविरोधातच आहेत. सगळी रस्सीखेंच मुख्यमंत्रीपदासाठी दिसतेय त्याचवेळी शाहांचं हे वक्तव्य आलं.


अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेला हसावं की रडावं हे कळत नसेल. कारण बिहारमध्ये भाजप इतकी उदारता दाखवतेय की जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील. पण मग याच मुख्यमंत्रीपदाच्या हट्ट्टावरुन त्यांनी महाराष्ट्रासारखं राज्य का गमावलं. तिथे अगदी मुख्यमंत्रीपद वाटून द्यायलाही भाजप तयार नव्हती. बिहारपेक्षा महाराष्ट्र हे कितीतरी महत्वाचं राज्य आहे. आर्थिक रसद इथून मोठी मिळते. त्यामुळेच भाजपच्या वागण्यातला हा फरक नेमका कशामुळे असा प्रश्न उपस्थित होतो.


राज्यपालांनी ते शब्द टाळायला हवे होते : गृहमंत्री अमित शाह


महाराष्ट्रात भाजपच्या जागा शिवसेनेच्या जवळपास दुप्पट आल्या ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये हा फरक तितका नसेलही कदाचित. पण प्रश्न केवळ मुख्यमंत्रीपदाचा नव्हता तर शिवसेनेचा इगो शांत करण्याचा होता. भाजप हायकमांडनं महाराष्ट्राच्या बाबतीत तोही प्रयत्न फारसा केला नाही. खऱंतर शिवसेना हा एनडीएतला सर्वात जुना पक्ष. नितीशकुमार तर 2014 लाही मोदींच्या थेट विरोधात होते. त्यामुळे भाजपच्या या मैत्रीमागची समीकरणं काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यातही आत्तापर्यंत बिहारमध्ये भाजपचा एकदाही मुख्यमंत्री बनलेला नाहीय. त्यामुळे यावेळी ती संधी आली तरी सोडू नये अशी अनेक नेते, कार्यकर्त्यांची इच्छा दिसतेय. पण बाकीच्या राज्यांत शत प्रतिशत भाजपचा नारा देणारे शाह बिहारमध्ये मात्र इतकी मवाळ भूमिका का घेतायत.


बिहारमें कुछ भी हो सकता है असं मत अनेक स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत. म्हणजे नितीशकुमार आरजेडी एकत्र येऊ शकतात. चिराग पासवान आणि भाजपचं सरकार बनवू शकतात. आरजेडी आणि काँग्रेसच्या सरकारला कुणी बाहेरुन पाठिंबाही देऊ शकतं. पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री बनतील का याबद्दल अनेकांना साशंकता वाटतेय. त्याचेवळी अमित शाहा यांनी हे ठासून सांगणं याचं अनेकांना आश्चर्य वाटतं.


याच मुलाखतीत अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या त्या वादग्रस्त पत्रावरही आपली नापसंती दर्शवली. या पत्राची भाषा योग्य नव्हती असं त्यांनी थेट म्हटलं आहे. हाथरस प्रकरणात यूपी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना शाहांनी मात्र एकप्रकारे योगींची पाठराखण केली. हा सगळा स्थानिक पातळीवरचा दोष असल्याचं सांगितलं.


अमित शाह हे आक्रमक शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. जिथे भाजप सर्वाधिक जागा असलेला पक्ष नाहीय, तिथेही त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री याआधी बसवलेला आहे. तेच अमित शाह आज बिहारमध्ये आमच्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशच असं म्हणतात हे पचनी पडायला कठीण आहे. आता हा महाराष्ट्रात हात पोळल्यानंतरचा धडा की नितीशकुमारांना राष्ट्रीय राजकारणात येऊ न देण्यासाठी राज्यातच कैद करण्यासाठीची चाल हे लवकरच कळेल. पण बिहारची खरी लढाई निवडणुकीच्या निकालानंतरच रंगणार हे मात्र त्यातून स्पष्ट होतंय.