नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील 24 तासात कोरोनाबाबत समोर आलेली सर्व माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. गेल्या 24 तासात देशभरात 34 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतलाय. कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 8356 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर जगभरात एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित संक्रमित रुग्णांची जगातील संख्या 16लाखांहून अधिक आहे. चीन, इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोनाचा सर्वाधित प्रभाव आहे.


आपला प्रयत्न सुरुवातीपासून अॅडव्हान्स अॅक्शनवर आहे, तयारीच्या बाबतीतही प्रशासन या व्हायरसपेक्षा एक पाऊल पुढे आहे. तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. देश पूर्णपणे लढण्यासाठी तयार आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं. या लढ्यात सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरही समाविष्ट आहे. यात सर्वात मोठी भूमिका सामान्य जनतेची आहे, त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावी आणि या परिस्थितीला गंभीररित्या घ्यावं असं आवाहन लव अग्रवाल यांनी केलं.


Corona Deaths | देशभरात 24 तासात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8356 - केंद्रीय आरोग्य मंत्रालय



24 तासात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासातील कोरोनाबाधितांचे आकडे सादर केले, मंत्रालयाच्या अहवालानुसार आतापर्यंत कोरोनाच्या 8356 पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. कालपासून आतापर्यंत 909 नवी प्रकरणं समोर आली आहेत आणि मृतांचा आकडा 273वर पोहोचलाय. केवळ 24 तासात कोरोनाने भारतात 34 बळी घेतलेत. कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 716 रुग्णांना घरी पाठवण्यात आलंय, त्यामुळे हे 716जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत हीच आनंदाची बातमी आहे, असं लव अग्रवाल यांनी म्हटलं. तर कालपासून 74 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.


कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर लक्ष - केंद्रीय आरोग्य मंत्रालय


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सध्या कोरोनाच्या टेस्टमध्ये वाढ करण्यावर लक्ष आहे. टेस्टिंगकरिता देशभरातील 14 संस्था नेमल्या गेल्या आहेत. टेस्टिंगच्या मदतीने आणखी कोरोनाची प्रकणं समोर येण्यास त्वरित मदत होईल. कोरोनाची 80 टक्के प्रकरणं कोविड केअर सेंटरमध्ये तपासली जातात, या व्यतिरिक्त काहींची तपासणी कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये केली जाते. क्रिटिकल केसेस कोविड हॉस्पिटलमध्ये तपासली जातात जिथे व्हेंटिलेटर आणि आयसीयूची सुविधा असते. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


येणाऱ्या संकटासाठी प्रशासन पूर्णपणे तयार - केंद्रीय आरोग्य मंत्रालय


कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 29 मार्चला देशभरात 979 पॉझिटिव्ह रुग्ण होते, आज आठ हजारांहून अधिक आहेत. यापैकी केवळ 20 टक्केच गंभीर प्रकरणं आहेत ज्यांना  आईसीयू, व्हेंटिलेटर सपोर्टची गरज आहे. आजही 1671 असे रुग्ण आहेत ज्यांना कधीही आयसीयूची गरज भासू शकते. सरकार या परिस्थितीसाठी तत्पर आहे. 29 मार्च रोजी 163 हॉस्पिटल्समध्ये 41900 बेडची व्यवस्था होती, 4 एप्रिल रोजी 67000 बेड उपलब्ध होते. 9 एप्रिल रोजी 1000 बेड्सची गरज होती तर 85000 बेड उपलब्ध होते. आज देशभरात 602 हॉस्पिटल्समध्ये 1 लाख 5 हजार बेड्सची व्यवस्था आहे. त्यामुळे देशात रुग्णांना उपचार घेताना कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही, असा दिलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.