Punjab Government Corona Advisory : राजधानी दिल्लीनंतर पंजाबमध्येही मास्कसक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांच्या सरकारने कोरोना नियमावली जारी केली आहे, त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. पंजाब सरकारनेच्या गृह विभागाकडून सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


पंजाब सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोना गाइडलाईनमध्ये सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याबाबातही सांगण्यात आलेय. त्याशिवाय, सर्व नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस अथवा बूस्टर डोस घेण्याबाबातही आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तात्काळ चाचणी करावी, तसेच विलगीकरणात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 






 मागील 24 तासांत पंजाबमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर पाच जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल, असाही निर्णय दिल्ली सरकारने घेतलाय. 


गर्दी टाळा, केंद्राकडून सूचना - 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता स्वातंत्र दिनाला गर्दी टाळण्याची सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आली आहे. स्वातंत्र दिनासाठी कोणत्याही मोठ्या समारंभाचं आयोजन करु नका, गर्दी टाळा अशी सचूना करण्यात आली आहे.


देशातील स्थिती काय?
 देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.