S Jaishankar on Medical Student: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप ही या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपण युक्रेन सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, युक्रेनची परिस्थिती पाहता ते ऑनलाइन अभ्यासक्रम चालवत आहेत.
तत्पूर्व, 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडून भारतात परतावे लागले होते. भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू करत भारतीय नागरिक आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना सुखरूप देशात परत आणले.
परराष्ट्र मंत्री युक्रेन सरकारच्या संपर्कात
युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आमची युक्रेन सरकारशी चर्चा सुरू आहे. आणखी काही पर्याय आहे का, ते आम्ही पाहत आहोत. परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय या गंभीर विषयावर विचार करत आहे.
लोकसभा समितीची शिफारस काय आहे?
भारतातील लोकसभेच्या समितीने युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना देशभरातील महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. 3 ऑगस्ट रोजी परराष्ट्र व्यवहार समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांच्या संस्थांमध्ये युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विचा करावा, अशी विनंती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला केली आहे.
परराष्ट्र मंत्री आधी काय म्हणाले?
याआधी मे महिन्यात वडोदरा येथे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही युक्रेनच्या आसपासच्या देशांशी बोलून भारतीय विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून ते त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुढे चालू ठेवू शकतील. यादरम्यान एस जयशंकर यांनी असा दावाही केला होता की, आपण हंगेरीशी याबद्दल बोललो होतो आणि तिथल्या सरकारनेही त्याला होकार दिला होता. दरम्यान, युक्रेनमधून सुमारे 14 हजार वैद्यकीय विद्यार्थी परतले होते. या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्याची मागणी होत आहे.