नवी दिल्ली : सध्या जगासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून सध्या देशात लॉकडाऊनचा 5वा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशातच आर्थिक व्यवहार थांबल्यामुळे येत्या काळात आर्थिक मंदीच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. त्यावेळी मोदी यांनी अनेक आर्थिक विषयांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना सांगितले की, 'सध्याच्या संकटाच्या काळात देशातील जनतेलासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही वाचवायचं आहे. यासाठी जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या परिस्थितीत, भारत लॉकडाऊनला मागे टाकत अनलॉक-1 च्या दिशेने पुढे जात आहे.'
पंतप्रधान मोदी म्हणाले : Yes ! We will definitely get our growth back
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी तर Getting Growth Back वरून पुढे जाऊन हेदेखील म्हणणार आहे की, Yes ! We will definitely get our growth back. तुमच्यापैकी काही लोक विचार करत असतील की, संकटाच्या या काळात, मी एवढ्या विश्वासाने हे कसं बोलू शकतो? माझ्या या विश्वासाची कारण अनेक आहेत.'
पंतप्रधान म्हणाले की, 'मला भारताची क्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनावर विश्वास आहे. मला भारताची प्रतिभा आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे. मला भारताच्या नाविन्य आणि बुद्धिमत्तेवर विश्वास आहे. मला भारताचे शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांवर विश्वास आहे.'
पाहा व्हिडीओ : भारत पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कार्यक्रमात पुढे बोलताना मोदी म्हणाले की, 'जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरु होतं. त्यावेळी भारताने मोठे निर्णय घेतले, वेळीच लॉकडाऊन लागू केले. या काळात आपल्या सुविधांमध्ये वाढ केली. त्यामुळेच जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्थिती बऱ्यापैकी चांगली होती. अर्थव्यवस्थेला मजबूत करणं सरकारचं प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये तातडीच्या निर्णयासोबतच दीर्घकालीन फायदा देणाऱ्या निर्णयांचाही समावेश आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत 74 कोटी लोकांना रेशन दिलं. स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य दिलं. आतापर्यंत गरीब कुटुंबाच्या खात्यावर 53 हजार कोटी रुपये टाकले आहेत.' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. Intent, Inclusion, Investment, Infrastructure आणि Innovation या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. म्हणजेच हेतू, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नाविन्य भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी महत्त्वाचं आहे.' तसेच लॉकडाऊन काळात 8 कोटी गॅस सिलेंडर मोफत दिले. खासगी कर्मचाऱ्यांना 24 टक्के ईपीएफओने सरकारने दिला. तसेच शेतकऱ्यांबद्दल अनेक निर्णय घेतले. यात शेतकरी आता कुठेही आपला माल विकू शकतो. कोल सेक्टरमध्येही अनेक निर्बंध उठवले आहेत. मायनिंग नियमांमध्ये बदल करण्यात आला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या :
भीम अॅपच्या 70 लाख युझर्सचा डेटा ऑनलाईन लीक झाल्याचा इस्त्रायली फर्मचा दावा, सरकारने दावा फेटाळला
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा