नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चाही जोरात सुरु झाल्या आहेत. त्यातही सर्वात चर्चा आहे अर्थमंत्रिपदाची. कारण आर्थिक आघाडीवरचं अपयश हाच सरकारसाठी सर्वात मोठा आव्हानाचा विषय आहे.


अर्थमंत्रीपदासाठी प्रख्यात बँकर के व्ही कामत यांच्या नावाची चर्चा काही पहिल्यांदा होत नाही. अगदी यावर्षीचं बजेट सादर होण्याच्या आधीही अशा बातम्या आल्या होत्या. कामत हे ब्रिक्स देशांच्या नॅशनल डेव्हलपमेंट बँकेचे चेअरमन म्हणून 27 मे रोजीच निवृत्त झाले. त्यानंतर या बातम्यांनी पुन्हा जोर धरला आहे.


कोण आहेत के व्ही कामत?




  • के व्ही कामत हे आयसीआयसीआय बँकेचे माजी चेअरमन

  •  इन्फोसिस या आयटी कंपनीतही कामाचा अनुभव

  • 2015 ला त्यांची ब्रिक्स देशांच्या नॅशनल डेव्हलपमेंट बँकेवर चेअरमन म्हणून नियुक्ती

  • के व्ही कामत हे सध्या 72 वर्षांचे आहेत.


कोरोनाच्या संकटकाळात सरकारने नुकतंच 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. त्यासाठी सलग पाच दिवस निर्मला सीतारामण पत्रकार परिषदा घेत होत्या. आर्थिक आघाडीवरचं एक मोठं काम त्यांच्याच नेतृ्त्त्वात पार पडलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन ऑगस्टपर्यंत सुरु होऊ शकतं. त्यामुळे अधिवेशनच्या तोंडावर हा बदल करण्याऐवजी वर्षाअखेरीस बिहार निवडणुकांच्या आसपास हा बदल होऊ शकतो, असं काही राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


अर्थमंत्री बदलण्याची किती शक्यता?




  • निर्मला सीतारमण या पंतप्रधानांच्या विश्वासू वर्तुळातल्या आहेत.

  • अर्थ, गृह, परराष्ट्र, संरक्षण या टॉप फोर मंत्रालयापैकी परराष्ट्र खातं आधीच एका बिगर राजकीय व्यक्तीकडे आहे.

  • के व्ही कामत यांना अर्थमंत्री केल्यास टॉप फोरपैकी दोन बिगर राजकीय मंत्री होतील. मोदी हे होऊ देतील याची शक्यता खूप कमी आहे.

  • निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत. सुषमा स्वराज यांच्यानंतर महत्त्वाच्या खात्यासाठी भाजपला चेहऱ्याची कमतरता असताना निर्मला सीतारमण यांना हटवलं जाऊ शकेल याबद्दलही अनेकांना संशय आहे.


मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात असलेले सुरेश प्रभू यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळालं नाही. त्यांच्याही कमबॅकची चर्चा अधूनमधून सुरु असते.


ज्या बदलांची जास्त चर्चा होते, ते मोदी कधीच करत नाहीत. हा पहिल्या पाच वर्षात सर्वांनीच घेतलेला अनुभव आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात प्रत्येकवेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या परफॉर्मन्सची चर्चा व्हायची. पण पहिल्या टर्ममध्ये ते शेवटपर्यंत कायम राहिले. आताही निर्मला सीतारामण यांच्याबाबतीत हेच होणार का आणि या चर्चा केवळ वावड्याच ठरणार का याची उत्सुकता आहे.


Nirmala Sitharaman यांच्या बदलीची चर्चा; बँकर के व्ही कामतांकडे अर्थमंत्रीपद जाण्याची शक्यता