नवी दिल्ली : कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा भारताची चिंता वाढवणारा आहे.  देशात कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 471वर पोहोचली आहे. आता एकूण 15 हजार 859 लोक उपचार घेत असून 3959 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 652 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या 24 तासात 49 लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर 1489 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोविड-19 च्या 15 हजार 859 लोकांवर उपचार सुरु आहेत, तर 3959 रुग्ण बरे होतं घरी गेले आहेत. यातील एक जण दुसऱ्या देशात गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार कोरोनाची बाधा झालेल्यापैकी 19 टक्क्यांहून अधिक जण योग्य उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांमध्ये 77 लोक परदेशी नागरिक आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5221 कोरोनाबाधित फक्त महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 2272, दिल्लीत 2156, राजस्थानमध्ये 1801, तामिळनाडू 1596 आणि मध्यप्रदेशात 1592  इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

VIDEO | कोरोनाच्या 100 बातम्या, जगभरातील कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स



वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढणार असून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही. तसेच सहा महिने ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली आहे. सतत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्लाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उद्या गुरुवारी आंदोलन करणार होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात ही अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत. सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉक डाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होणार आहे.