नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात ही अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत. सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉक डाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होणार आहे.


लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातही पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांचा कल जाणून घेतला होता. 14 एप्रिलला लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची मुदत संपत होती. त्याआधी 10 एप्रिलला पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानंतरच देशपातळीवर ही मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. आता सोमवारी होणाऱ्या बैठकीतही राज्यांचं लॉकडाऊन वाढवण्याबाबत काय मत आहे, याचा अंदाज घेतला जाईल.


परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनबाबत काय बोलणार?


याशिवाय महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन पाठवण्याबाबत वेळीच नियोजन करण्याचा पुनरुच्चार केंद्राकडे केला होता. त्या मागणीबाबत केंद्राकडून काही प्रतिसाद येतो का हेही पाहावं लागेल.


जीएसटी करातील वाटा मिळणार का?


आर्थिक पातळीवरही महाराष्ट्राच्या काही मागण्या आहेत. जीएसटी करातला वाटा वेळीच मिळावा यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आत्तापर्यंत केंद्राला तीन पत्रं लिहिलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं या दोन महत्वाच्या मागण्यांबाबत या बैठकीत काही विचार होतो का हे पाहावं लागेल. देशातला लॉकडाऊन आणखी वाढणार का? या प्रश्नाचं उत्तरही याच बैठकीत मिळेल.


राज्यातील कोरोनाची परिस्थिती


राज्यात आज कोरोनाच्या 431 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5649 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 10 जण मुंबईचे तर पुण्याचे दोन तर दोन औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव, मालेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 269 जणांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या







Corona Ground Report | कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट! काय म्हणतोय गावाकडचा कोरोना?