नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. त्यामध्ये 24 टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन सापडला असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात देण्यात आली होती.
डबल म्युटेशन कोरोना स्ट्रेन हा महाराष्ट्रातील अनेक रुग्णांमध्ये सापडल्याची माहिती आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात सापडलेला डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना हा बी.1.617 लिनीज स्ट्रेन असल्याचं सांगण्यात येतंय.
गेल्या आठवड्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने महाराष्ट्रातील जिल्हा प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. त्यामध्ये गेल्या काही महिन्यात जमा करण्यात आलेल्या 361 नमुन्यांपैकी 220 नमुने म्हणजे 61 टक्के नमुने हे डबल म्युटेशन स्ट्रेनचे असल्याचे सांगण्यात आलं आहे. डबल म्युटेशन स्ट्रेनची माहिती घेण्यासाठी देशभरात जीनोम सिक्वेन्सिंगचा डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भारतात सापडलेल्या कोरोनाचा डबल म्युटेशन स्ट्रेन हा किती धोकादायक आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही पण डबल म्युटेशन स्ट्रेनमुळे भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा डबल म्युटेशन स्ट्रेन भारतातील महाराष्ट्र, दिल्ली, बंगाल, गुजरात, कर्नाटक या दहा राज्यांमध्ये पसरल्याची आशंका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली असून त्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे असंही सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :