बेळगाव :  कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. 


दरम्यान येडीयुरप्पा यांनी ट्वीट करुन कोरोनाची बाधा झाल्याचं सांगितलं आहे. तसंच माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने दवाखान्यात भर्ती झालो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करावी आणि सेल्फ क्वारंटाईन व्हावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. 






गुरुवारी सकाळी बेळगावात रोड शोत देखील ते सहभागी झाले होते. पण रोड शो अर्ध्यावर सोडून ते हॉटेलवर परतले. नंतर त्यांनी बंगळुरुला प्रयाण केले. गुरुवारी सकाळी रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी टेस्ट केली. त्यानंतर त्यांना कोरोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेळगावात प्रचाराच्या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री उमेश कत्ती, जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या समवेत प्रचाराच्या वेळी होते. भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि अनेक कार्यकर्ते देखील प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या संपर्कात होते.