Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात आज किंचित वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. भारतात गेल्या 24 तासांत एक हजार 132 नवीन रुग्ण आढळले असून 14 कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्ते सातत्याने घट पाहायला मिळत होती. पण आज मात्र कोरोना रुग्णसंख्या 50 ने वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांमुळे भारतातील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 60 हजार 579 वर पोहोचला आहे. यातील 4 कोटी 41 लाख 15 हजार 557 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनामृतांचा आकडा 5 लाख 30 हजार 500 वर पोहोचला आहे.
देशात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या
नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1132 रुग्णांची नोंद आणि 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 1082 नवीन कोरोनाबाधित आणि 12 रुग्णाचा मृत्यू झाला होता. देशव्यापी लसीकरणात भारतात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 90 कोटीहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
जगभरात नव्या XBB व्हेरियंटचा वाढता धोका
कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत. कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे. येत्या काळात कोरोनाच्या लाटेचा धोकाही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनासोबतच इतर आजारांचा वाढता धोका
सध्या देशात कोरोनासोबतच जिवाणूजन्य आजार ( Bacterial Infection ) वाढताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे लोकांना फ्लू, सर्दी, खोकला किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन या आजारांची लागण होताना दिसत आहे. कोरोना महामारीमुळे लोकांनी बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून बचाव होण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. त्यामधील एक चांगली सवय म्हणजे हात धुणे. पण सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळतोय, त्यामुळे लोक पुन्हा या सवयींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.