MonkeyPox: कोरोना महासाथीचा (Coronavirus) आजार आटोक्यात येत असताना दुसरीकडे मंकीपॉक्सचा (MonkeyPox) संसर्ग वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox in Delhi) संसर्ग कसा फैलावला, याबाबत एक संशोधन करण्यात आले होते. या संशोधनानुसार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने आजाराचा संसर्ग फैलावला. या आजाराच्या संसर्गाबाबत STI क्लिनिकमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देण्याची शिफारस संशोधन अभ्यासात करण्यात आली आहे.


दिल्लीतील लोक नायक रुग्णालयात मंकीपॉक्सच्या संसर्गामुळे दाखल करण्यात आलेल्या पहिल्या पाच रुग्णांवर संशोधन करण्यात आले होते. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार हा दावा करण्यात आला असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. दिल्लीतील या रुग्णांनी परदेशवारी केली नव्हती. मंकीपॉक्स बाधित रुग्णांची कंबर आणि त्याखालील भागात अधिक जखमा, व्रण दिसून आले. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे संसर्ग फैलावला असल्याचे आढळून आले.


मंकीपॉक्सबाधित रुग्णांना दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान, रुग्णांमध्ये 14 दिवसांमध्ये ताप, अंगदुखी आदी तक्रारी समोर आल्यात. या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. या पाचही रुग्णांच्या गुप्तांगावर जखमेचे व्रण होते. 


या संशोधन अभ्यासात रुग्णांची लघवी आणि जखमांच्या नमुन्यातून मंकीपॉक्सच्या डीएनएची रचना समजून आली. संसर्गबाधित गंभीर आजारी झाले नव्हते. सर्व रुग्ण उपचारानंतर ठीक झाले. या रुग्णांना झालेल्या संसर्गाची वेळीच माहिती झाली आणि वेळेवर  उपचार झाल्याने आजाराने गंभीर स्वरुपधारण केली नाही, असेही संशोधन अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 


हे संशोधन लोक नायक रुग्णालयातील त्वचाविज्ञान विभागाचे प्रा. विनीत रेल्हान आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या प्रज्ञा यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यांनी सांगितले की, पाच पैकी तीन रुग्णांनी लक्षण दिसण्याआधी 21 दिवसांमध्ये लैंगिक संबंध ठेवले असल्याचे मान्य केले. तर, दोन रुग्णांनी ही बाब नाकारली. लैंगिक संबंधाने आजार होणे ही बाब नकारात्मक वाटत असल्याने त्यांनी नाकारले असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: