नवी दिल्ली : भारतात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, जगभरात एका दिवसांत समोर येणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या आकड्यापैकी 40 टक्के रुग्ण भारतातील आहेत. तसेच भारतातील मृतांचा आकडाही एका दिवसांत जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या एकूण आकड्यापैकी 26 टक्के आहे. परंतु, संसदेच्या अधिवेशनादरम्यान सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत कोरोनाच्या प्रादुर्भावाची आकडेवारी सादर केली. त्यावेळी ते म्हणाले की, 11 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाचे एकूण 45 लाख 62 हजार रुग्ण होते आणि 76 हजार 271 लोकांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.67 टक्के एवढा होता. तर जगभरातील मृत्यूदर 3.2 टक्के एवढा होता. तोपर्यंत देशात 35 लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले होते.


सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे जवळपास 92 टक्के माइल्ड केस आहेत. त्यापैकी केवळ 5.8 टक्के रुग्णांमध्ये ऑक्सिजन थेरपीचा वापर करण्यात आला. तर केवळ 1.7 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली.


जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती उत्तम


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यास यशस्वी झाला आहे. देशात प्रति 10 लाख लोकसंख्येपैकी सरासरी 3328 कोरोना बाधित आणि 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा कोरोनाने प्रभावित झालेल्या आपल्यासारख्या दुसऱ्या देशांपैकी अत्यंत कमी आहे.'


काही अशी राज्य आहेत, जिथे कोरोचा प्रादुर्भाव वाढला आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तमिळनाडु, केरल, कर्नाटक, तेलंगाना, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या आहे.


सरकारचं म्हणणं आहे की, आधी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे देशाला मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊन लागू केल्यामुळे 14-29 लाख लोकांचा कोरोनापासून बचाव झाला आहे. लॉकडाऊन लागू केला नसता तर आणखी 37 ते 78 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती.


महत्त्वाच्या बातम्या :