नवी दिल्ली : देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सगळीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या लसींचा अपुरा पुरवठा अशी स्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताने आपल्या परकीय मदत स्वीकरण्यासंबंधी 16 वर्षापूर्वीच्या एका धोरणात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, भारत आता इतर देशांकडून परकीय मदत, दान किंवा गिफ्ट स्वीकारू शकतो. कोरोनामुळे भारताच्या या धोरणात महत्वपूर्ण बदल झाला आहे. 


या बदललेल्या धोरणाचा आणखी एक फायदा म्हणजे भारत आता चीनकडूनही ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी साहित्य किंवा जीव वाचवणारी औषधं खरेदी करू शकतो. या व्यतिरिक्त राज्य सरकारही जीव वाचवण्यासाठीची आवश्यक औषधं आणि साहित्य जगातल्या इतर देशांकडून स्वतंत्र्यपणे खरेदी करू शकतात. केंद्र सरकार त्यांना कोणतीही आडकाठी आणणार नाही. पण अशी मदत जर पाकिस्तानकडून करण्यात आली तर काय करायचे याबाबत भारताचं कोणतंही धोरण ठरलेलं नाही. 


आत्मनिर्भरता आणण्यासाठी घेतला होता निर्णय 
भारताच्या धोरणात झालेला बदल हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 16 वर्षापूर्वी, परकीय मदत न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्या आधी भारताने उत्तर काशी भूकंप (1991), लातूर भूकंप (2003), गुजरात भूकंप (2001), बंगालचे वादळ (2002) आणि बिहार पूर (2004) या संकटाच्या दरम्यान परकीय मदत स्वीकारली होती. 


डिसेंबर 2004 साली भारतात आलेल्या त्सुनामीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भारत कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो त्यामुळे यापासून पुढे कोणत्याही आपत्तीच्या वेळी परकीय मदत स्वीकारणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर भारताने 2013 मध्ये केदारनाथ पूर, 2005 सालचा काश्मिर भूकंप आणि 2014 सालच्या काश्मिर पूर स्थितीमध्ये परकीय मदत स्वीकारण्याचं नाकारलं होतं. 


केरळमध्ये 2018 साली आलेल्या पूर परिस्थितीवेळी संयुक्त अरब अमिरातीने 700 कोटी रुपयांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने तशी कोणतीही मदत स्वीकारण्याचे नाकारले होते. 


कोरोना संकटात 20 देशांनी केली मदत
सध्या भारत कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे आपल्या 16 वर्षाच्या जुन्या धोरणात बदल करावा लागला आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स या देशांसोबत जगातल्या 20 देशांनी भारताला वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे. तसेच चीनसोबतच्या धोरणातही बदल झाला असून भारताने चीनला 25 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची ऑर्डर दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या :