Corona Cases Today : देशात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवनवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 379,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3645 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,69,507 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 360,960 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
एक वेळ अशी होती की, ज्यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली होती. यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी देशात 8,635 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. एका दिवसात नोंद करण्यात आलेली कोरोनाबाधितांची ही संख्या या वर्षातील सर्वात कमी होती.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 83 लाख 76 हजार 524
- एकूण मृत्यू : 2 लाख 4 हजार 832
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 50 लाख 86 हजार 878
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 30 लाख 84 हजार 814
- देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 20 हजार 648 डोस
महाराष्ट्रात काल राज्यात 63,309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, 61181 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात काल (बुधवारी) राज्यात 63,309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, 61181 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल सर्वाधिक 985 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26527862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4473394 (16.86टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गोव्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
गोव्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या राज्यात आता 29 एप्रिल ते 3 मे असा पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. गुरुवारी सध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 3 मेच्या सकाळी 6 वाजेपर्यंत गोव्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहिल.
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असताना देशाच आणि राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन कायम ठेवणे गरजेचं आहे. मंत्र्यांनी 15 दिवस लॉकडाऊन वाढीचा आग्रह धरला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबची घोषणा करतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Cowin Registeration : पहिल्याच दिवशी Cowin App वर 1 कोटींहून अधिक नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी
- Corona Vaccine Registration : 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; कशी कराल नोंदणी?
- Lockdown In Goa: गोव्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद