Coronavirus Cases : देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर; काल दिवसभरात 3 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 55 लोकांचा मृत्यू.

Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तीन हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 19 हजार 719
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 719 झाली आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 5 लाख 23 हजार 975 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 47 हजार 699 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राजधानीत काल दिवसभरात 1354 रुग्णांची नोंद
दिल्लीमध्ये काल दिवसभरात 1354 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पॉझिटिव्हिटी दर 7.64 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी शहरात 17 हजार 732 नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 18,88,404 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 26,177 वर पोहोचला आहे. शहरात सध्या 5,853 रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात मंगळवारी 188 रुग्णांची नोंद तर 166 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 188 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे. राज्यात सध्या 1049 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 166 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल (बुधवारी) एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 469 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,02,70, 696 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.























