Covid19 in India : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह (China), अमेरिका (America), ब्राझील (Brazil) आणि जपानमध्येही (Japan) कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अशात भारतामध्ये मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती सामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
भारतातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी एका दिवसाला लाखोंच्या संख्येत आढळणारं नवीन कोरोना रुग्णांचं प्रमाण आता 131 वर पोहोचलं आहे. मात्र, अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गाफील राहण्याची चूक करु नका, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
देशात पुन्हा कोरोना निर्बंध?
जगभरातील कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता वेग पाहता भारत सरकारकडून (Government of India) आवश्यक पाऊलं उचलण्याची तयारी सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती काय?
राज्यात गेल्या 24 तासांत 20 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात सध्या 132 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुण्यामध्ये 48 तर मुंबईमध्ये 36 तर ठाण्यामध्ये 9 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 81,36,368 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 79,87,824 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात कोरोनामुळे एकूण 1,48,412 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये सात नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये सात नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये सहा आणि औरंगाबादमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर नागपूर, लातूर आणि अकोल्यामध्येही प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत.
केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना
जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, प्रशासन अलर्टवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले.