Coronavirus : देशात सहा महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्ण; 862 रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात तब्बल 196 दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सणासुदीच्या काळात ही एक दिलासादायक बातमी आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात तब्बल 196 दिवसांनंतर म्हणजेच सुमारे सहा महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सणासुदीच्या काळात ही एक दिलासादायक बातमी आहे. देशात गेल्या 24 तासांत 862 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सहा महिन्यांनंतर इतकी कमी रुग्णसंख्या आढळली आहे. याआधी 12 एप्रिल 2022 रोजी 796 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हा कोरोना रुग्णांचा आलेख सुमारे तीन लाख रुग्णांपर्यंत पोहोचला होता. मात्र ऐन दिवाळीच्या काळात रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याची बाब दिलासादायक आहे.
एकीकडे शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त होत आहे. देशासह जगभरात कोरोनच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या नवीन तीन व्हेरियंटमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही नव्या व्हेरियंटबद्दल धोका व्यक्त करत कोरोनाची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा काळात कोरोनाच्या संभाव्य पाचव्या लाटेचा धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान देशातील कोरोनाबाधित मात्र घटले आहेत. देशात आज 862 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 44 हजार 938 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 40 लाख 93 हजार 409 रुग्ण बरे झाले आहेत.
India logs 862 new coronavirus infections taking COVID-19 tally to 4,46,44,938, death toll climbs to 5,28,980: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2022
देशातील उपचाराधीन रुग्णांची म्हणजेचं सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 193 वरून 22 हजार 549 वर घसरली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 28 हजार 980 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.
WHO कडून धोक्याचा इशारा
जगभरात BF.7, XBB आणि BA.5 हे नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. चीन, इंग्लंडसह अनेक देशांमध्ये नवे व्हेरियंट वेगाने पसरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नव्या कोरोना व्हेरियंटबाबत चिंता वर्तवत धोक्याचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) XBB व्हेरियंटमुळे प्रशासनासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत. सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.