Coronavirus Cases in India : देशात कोरोना प्रादुर्भावात पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत 21 हजार 566 नवे रुग्ण
Coronavirus Cases in India : कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 881 झाली आहे.
Coronavirus Cases in India : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona) व्हायरसच्या 21 हजार 566 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 4.25 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या देशात 1 लाख 48 हजार 881 सक्रिय रुग्ण आहेत.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी कोरोना व्हायरस संसर्गाच्या 686 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. दिल्लीत आतापर्यंत 19,45,664 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 26,296 वर पोहोचला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत काल 290 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत बुधवारी 290 रुग्णांची नोंद, 382 कोरोनामुक्त
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 382 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,00,198 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 635 झाली आहे. सध्या मुंबईत 2,003 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 290 रुग्णांमध्ये 273 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2621 दिवसांवर गेला आहे.
राज्यात बुधवारी 2325 कोरोना रूग्णांची नोंद
राज्यात काल (बुधवारी) 2325 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2471 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. राज्यात काल सात कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,62,431 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.