Coronavirus : देशात कोरोना रुग्णसंख्येचा (COVID 19) वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात 2300 हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government) सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी बैठक बोलावली आहे.


आरोग्य मंत्री घेणार बैठक


आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उद्या, शुक्रवारी (7 एप्रिल) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत (States, UTs Health Minister) बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.


देशात कोरोनाचे 5,335 नवीन रुग्ण आढळले


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 5 हजार 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सक्रिय रुग्ण आता 25 हजार 587 पर्यंत वाढले आहेत. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात पाच हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच बुधवारी (5 एप्रिल) देशात 4 हजार 435 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते.


महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 569 रुग्ण


गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 569 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. बुधवारी नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी 221 रुग्ण एकट्या मुंबईत नोंदवण्यात आली आहेत. नवीन रुग्णांसह राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3874 वर पोहोचली आहे. मुंबई (1244), पुणे (561) आणि ठाणे (703) मध्ये कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आदल्या दिवसाच्या (4 एप्रिल) तुलनेत राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 711 रुग्ण आढळले होते.


दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 500 हून अधिक रुग्ण


देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दिल्लीत मागील 24 तासांत 509 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, दिल्लीमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 795 वर पोहोचली आहे. याशिवाय नोएडामध्ये 47 रुग्ण आढळले आहेत, तर गाझियाबादमध्ये एकूण 13 रुग्ण आढळले आहेत.


किती लोकांना लस मिळाली?


दरम्यान आतापर्यंत देशात 220.66 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस 102.74 कोटींहून अधिक लोकांना देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 95.20 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, 22.72 कोटींहून अधिक लोकांना प्रीकॉशन डोस देखील मिळाला आहे.