BJP Foundation Day: भाजपच्या 44व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 40 मिनिटं 43 सेकंदांच्या भाषणात पंतप्रधानांनी पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला. कार्यकर्त्यांना संघटित आणि मजबूत होण्याचा मंत्र दिला. तसेच, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर निशाणाही साधला. याशिवाय पंतप्रधानांनी भविष्यातील योजनाही सांगितल्या आहेत. 


पंतप्रधानांनी पक्षाच्या संस्थापक सदस्यांना जुन्या नेत्यांची आठवण करून दिली. आज हनुमान जयंती आहे. त्यामुळे हनुमानाचा उल्लेख करतानाही पंतप्रधान मोदींनी अनेक उदाहरणे दिली. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. मोदी म्हणाले की, "आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमंताची जयंती साजरी करत आहेत. बजरंगबलीच्या नावाचा जयघोष सर्वत्र घुमत आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आणि घटना आजही आपल्याला प्रेरणा देतात. महान शक्तीचे आशीर्वाद आपल्या यशामध्ये दिसून येतात."


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भगवान हनुमान, लक्ष्मण ते भ्रष्टाचार आणि कबरीचा उल्लेख केला. जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे... 


आज भारतानं आपली ताकद ओळखलीये : पंतप्रधान मोदी 


"हनुमानजींमध्ये असीम शक्ती आहेत, परंतु ते या शक्तीचा उपयोग तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्यांच्या स्वतःवरच्या शंका दूर होतील. 2014 पूर्वी भारतातही अशीच परिस्थिती होती. भारताला आता बजरंगबलीसारख्या आपल्यातील सुप्त शक्तींची जाणीव झाली आहे. समुद्रासारख्या मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहे. हनुमानजींच्या अशा गुणांपासून भाजप कार्यकर्ते आणि पक्ष प्रेरणा घेतात.", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


माता भारती देखील हनुमानजींप्रमाणे कठोर असावी : पंतप्रधान मोदी 


"हनुमानजी सर्व काही करू शकतात, सर्वांसाठी करतात, परंतु स्वतःसाठी काहीही करत नाहीत. हिच भाजपची प्रेरणा आहे. आणखी एक प्रेरणा आहे. हनुमानजींना जेव्हा राक्षसांचा सामना करावा लागला, तेव्हा ते तितकेच कठोर झाले. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो, घराणेशाहीचा प्रश्न येतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, तेव्हा भाजपही तितकाच निर्ढावलेला असतो. माता भारतीला या दुष्कृत्यांपासून मुक्त करण्यासाठी कठोर व्हावं लागलं, तर कठोर व्हा.", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


BJP चा 'Can Do' वाला अॅटिट्यूड : पंतप्रधान मोदी 


"हनुमानजींच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकल्यास, प्रत्येक प्रकारच्या यशात त्यांची 'Can Do' वृत्ती आणि दृढनिश्चय खूप मोठी भूमिका बजावतं. जगात कोणतं काम अवघड आहे, जे तुमच्याकडून होत नाही. हनुमान करू शकत नाही, असं कोणतंही काम नाही. लक्ष्मण संकटात असताना हनुमानानं संजीवनी पर्वत आणला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपकडूनही असे प्रयत्न केले जात आहेत, यापुढेही करत राहतील. "राम काज किन्हें बिनु मोहि कहां विश्राम", असंही मोदी म्हणाले. 


भाजपचं काम काही लोकांना पचनी पडत नाही  : पंतप्रधान मोदी 


"आमची चेष्टा करून ते यशस्वी झाले नाहीत, तेव्हा साम्राज्यवादी मानसिकतेच्या लोकांचा द्वेष आणखी वाढला. अनेक दशकांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांततेचा सूर्य उगवेल, असे त्यांना वाटलं नव्हतं. कलम 370 इतिहासजमा होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. जी कामे गेली अनेक दशके झाली नाहीत, ती भाजप कशी करत आहे, हे त्यांच्या पचनीच पडत नाही.", असंही मोदी म्हणाले. 


हताश लोक म्हणतात, मोदी तुमची कबर खोदली जाईल : पंतप्रधान मोदी 


"यांच्या मनात द्वेष निर्माण झाला आहे, त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. त्यांची भ्रष्ट कृत्य उघड झालेली पाहून ते अस्वस्थ आणि निराश झाले आहेत. हे एवढे निराश आहेत की, त्यांना एकच मार्ग दिसतोय. उघडपणे बोलतायत की, मोदी तुमची कबर खोदली जाईल. ते कबर खोदण्याची धमकी देत आहेत.", असंही मोदी म्हणाले. 


लोकशाहीच्या उदरातून भाजपचा जन्म झालाय : पंतप्रधान मोदी 


"आम्ही 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वाच्या मार्गावर चालतोय. लोकशाहीच्या उदरातून भाजपचा जन्म झालाय. लोकशाहीच्या अमृतानं ते पोसले असून देशाची लोकशाही आणि राज्यघटना मजबूत करताना भाजप देशासाठी रात्रंदिवस समर्पित भावनेनं काम करतंय. आमचे समर्पण भारत मातेला आहे. देशाच्या कोट्यवधी जनतेला आमचे समर्पण आहे. देशाच्या संविधानाला आमचे समर्पण आहे.", असं मोदी म्हणाले.