मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीय. दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम देखील सुरु आहे. देशात सध्या दोन लसी दिल्या जात आहेत. यातील स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोव्हॅक्सिन लस सध्या घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोवॅक्सिनची ओव्हरॲाल कार्यक्षमता 78 टक्के तर गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम असल्याचं म्हटलं आहे. 


भारत बायोटेक आणि आयसीएमआरने आज कोव्हॅक्सिनच्या फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला.   त्यात कोव्हॅक्सिनच्या एकूण 78 टक्के अंतरिम क्लिनिकल कार्यक्षमतेची (efficacy) नोंद झाली आहे.   


कंपनीने आज एका निवेदनात म्हटले आहे की, दुसर्‍या अंतरिम निकालांमध्ये असे दिसून आले होते की भारताच्या पहिल्या कोविड लसीमध्ये गंभीर कोविड रोगाविरूद्ध प्राथमिक कार्यक्षमता दिसून आली. त्यात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या प्रकरणांमध्ये 127 प्रकरणात लक्षणे आढळून आली आहेत. परिणामी सौम्य, मध्यम आणि गंभीर कोविड आजाराच्या विरूद्ध लसीची कार्यक्षमता 78 टक्के इतकी आहे.


आयसीएमआर, एन सी  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आयसीएमआर अभ्यासानुसार ही स्वदेशी कोरोना व्हायरस लस कोव्हॅक्सिनला विषाणूच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. आयसीएमआरनं म्हटलं आहे की, कोव्हॅक्सिन ही यूके आणि ब्राझीलमधील व्हेरियंटविरूद्ध कार्यक्षम आहे.