नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी राजपथावर आज छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याने देशाचं लक्ष वेधून घेतलं.
‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल झाला.
यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.
कवी भूषण यांचं ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं, त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.
यावेळी राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ होते.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवण्यात आले.
या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले.
दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजेंची उभं राहून घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jan 2018 11:14 AM (IST)
‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -