मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाजप सरकारविरोधात मुंबईत आज विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सांगता होईल.


शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून संविधान बचाव रॅली निघणार आहे. कोणत्याही झेंड्याखाली न येता संविधानाला धक्का लागू नये यासाठी अराजकीय रॅली काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

आज निघणाऱ्या या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शरद यादव, माकप नेते सीताराम येचुरी, डी राजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी नेता यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहतील.

पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह

देशातील सामाजिक सलोखा बिघडलेला असून अनेक ठिकाणी जातीय दंगली घडवल्या जात आहेत. यामधूनच राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे राज्यघटनेवरील विश्वासाला तडा जात आहे. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण असून अनेक समाज दबावाखाली आले आहेत. न्यायालयीन व्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप, शेतकऱ्यांमधील असंतोष थांबावा, यासाठी सर्वपक्षीय अराजकीय संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

सुरुवातीला या संविधान बचाव रॅलीली मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली होती. परंतु कोणत्याही परिस्थितीत रॅली होणारच असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रॅलीत सहभागी व्हावं किंवा प्रतिनिधी पाठवावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारची सभा किंवा घोषणाबाजी होणार नाही. रॅली पूर्ण झाल्यानंतर दोन तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे.