पुणे : 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो. 2005 मध्ये पहिल्यांदा उच्च रक्तदाब दिन पाळला गेला. वर्ल्ड हायपरटेन्शन लिगच्या पुढाकाराने हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब या आजाराबाबत जागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्याची सुरुवात झाली. पण आत्ताच्या कोरोनाच्या छायेत उच्च रक्तदाबाकडे अधिक लक्ष देणं महत्त्वाचं बनलं आहे. याचं कारण म्हणजे हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो आणि एक आजार असताना (कोमाॅरबीडीटी) कोरोनाची लागण होणं हे काॅम्बिनेशन घातक ठरु शकतं.


“खूप वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या शरिरातील रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा परिणाम आपल्या हृदय, मेंदू आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे प्रत्येकाने आपल्या शरिरातील रक्तदाब वाढायला नको अशी काळजी घेतली पाहिजे,” अशी माहीती डाॅ हरिष पाटणकर यांनी दिली.


पण उच्च रक्तदाब या आजाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हा आजार आपल्याला आहे हेच बहूतांश लोकांना माहिती नसतं. त्यामुळेच यावर्षीची उच्च रक्तदाब दिनाची थीम ही ‘Know your numbers’ ही आहे. म्हणजे आपला रक्तदाब किती आहे, हे माहीती असणं आवश्यक आहे.


‘हृदयविकार, किडनीचे आजार, कॅन्सर श्वसनाचे आजार अशा लोकांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यांना मृत्यूचा धोका जास्त असतो. यामध्ये जर ब्लड प्रेशरचाही त्रास असेल तर जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. उच्च रक्तदाब हे वेळीच ओळखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सतत डाॅक्टरांचा सल्ला घेत राहणं आवश्यक आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुणीही आपल्या गोळ्या बंद करु नयेत,” असं डाॅ नितीन बोरा यांनी सांगितलं.


यामुळे कोरोनच्या साथीमुळे आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. कोरोनाशी लढताना आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणं आवश्यक आहे. इतर कोणत्याही व्याधी जडणार नाहीत आणि जर त्या असल्या तर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. उच्च रक्तदाब या आजाराला तर सायलेंट किलरच म्हटलं जातं. त्यामुळे यावर्षीच्या थीमनुसार आपला रक्तदाब किती आहे हे तपासून घ्यायला हरकत नाही.


Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट