नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी (16 मे) रात्री उशिरा केली. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करू असं ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्वीटनंतर ट्रम्प यांचे आभार मानले.


नरेंद्र मोदी यांनी मानले आभार


पीएम मोदी ट्विटमध्ये म्हणाले, ट्रम्प यांचे आभार. आम्ही सर्वजण या साथीच्या विरोधात एकत्रितपणे लढा देत आहोत. अशा वेळी, राष्ट्रांनी एकत्र काम करण्यासाठी जितके शक्य असेल तितके सहकार्य करणे आणि जगाला कोविड - 19 पासून मुक्त करणे आवश्यक आहे.





ट्रम्प आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान करण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा पराभव करू. यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.'


कोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे.


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातील स्थलांतरित मजुरांसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :



पीएम केअर फंडातून 3100 कोटींचं वाटप; स्थलांतरित मजूर, व्हेंटिलेटर्स अन् लस विकसित करण्याठी तरतूद




Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनसाठी आज गाईडलाईन्स घोषित होणार