नवी दिल्ली: देशात सुरु असलेल्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलंय. त्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर नियोजन सुरु आहे. महत्वाचं म्हणजे या 25 कोटी लोकांना कोरोनाचा डबल डोस देण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'येत्या जुलै महिन्यापर्यंत भारतातील जवळपास 20 ते 25 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 40 ते 50 कोटी डोस उपलब्ध करणे आणि त्याचा वापर करणे यासाठीचे नियोजन सुरु आहे. तसेच त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रशिक्षण या क्षमतामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत."


Maharashtra Corona : दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी नियम पाळणे अत्यावश्यक : मुख्यमंत्री ठाकरे


डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, "कोल्ड चेन सुविधा आणि ब्लॉक स्तरावर पायाभूत सुविधा उपलब्धीसंबंधी काय तयारी आहे याची माहिती राज्यांकडून मागवण्यात आली आहे. भारतात तीन लसींचे ट्रायल सुरु असून केवळ कोव्हिशिल्ड या लसीने तिसऱ्या चरणातील ट्रायल पूर्ण केलं आहे."


सीरमकडून मिळू शकतात 20 कोटी डोस
सीरम इन्स्टिट्यूटने भारत आणि इतर गरीब देशांसाठी 20 कोटी डोस उपलब्ध करुन देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये सर्वात कमी म्हणजे पाच कोटी डोस हे 250 प्रति डोस इतक्या किंमतीने भारतात उपलब्ध होणार आहेत. सध्या झायडस कॅडिला आणि भारत बायोटेककडून तयार करण्यात येणाऱ्या लसींचे ट्रायल सुरु आहे. तसं पहायला गेलं तर कोणत्याही लसीच्या ट्रायलला आणि त्याच्या वापराच्या मंजुरीसाठी काही वर्षे लागतात, पण कोरोनाच्या संकटाची तिव्रता पाहता अनेक देशांनी याच्या प्रक्रियेला आणि वापराला जलद मान्यता दिली आहे.


भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पीएम-केअर फंडमधून 2200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चाच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त हा निधी आहे, अशी माहिती केंद्रीय सचिवांनी मंगळवारी दिली. कोरोना व्हायरस साथीच्या वेळी मार्च 2020 मध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पीएम केअर फंडची स्थापना करण्यात आली होती.


Corona Virus : कोरोना व्हायरससोबत संक्रमण देखील रोखते ऑक्सफोर्डची लस, नव्या संशोधनात खुलासा