मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. सोमवारी (6 सप्टेंबर) एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 69 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 



भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत  आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात सोमवारी 6 ऑगस्टला कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे. गेल्या 11 दिवसात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याचा विक्रम करण्याची ही तिसरी वेळ आहे. 



आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज पुन्हा 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.या सोबत देशात आतापर्यंत 69.72 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या अगोदर  देशात दोनदा हा विक्रम करण्यात आला आहे. आज 1 कोटी 8 लाख 36 हजार 984 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत नागरिकांचे अभिनंदन केले आहे. 



गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची भर तर 308 जणांचा मृत्यू


देशात कोरोनाची तिसरी लाट कधीही येण्याची शक्यता असताना अद्याप दुसरी लाट ओसरल्याचं दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 42,766 नव्या रुग्णांची भर पडली असून 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 38,901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी देशात 42, 618 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 29,682 रुग्णांची भर पडली आहे. तसेच 142 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत केरळमध्ये 41 लाख 81 हजार 137 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.