Nipah Virus : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचंही आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. अशातच केरळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकड्यापैकी सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद केरळात करण्यात येत आहे. अशातच आता कोरोनापाठोपाठ केरळात निपाह व्हायरसचाही वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. निपाहच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केरळात एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यूही झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, निपाह व्हायरसची लागण झाल्यामुळे या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. 


केरळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात निपाहमुळे झालेल्या 12 वर्षांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुलाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याच्यात काही लक्षणं दिसून आली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी निपाह व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर शनिवारी केरळ सरकारनं आरोग्य अधिकाऱ्यांची एक उच्च स्तरिय बैठक बोलावली होती. 


निपाह जीवघेणा विषाणू


जगभरात निपाह हा हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. प्राण्यांमधून माणसामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर तो अत्यंत जीवघेणा आजार असतो. त्यामुळे या आजाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते. महाराष्ट्राच्या दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये 'निपाह' हा विषाणू आढळून आला होता. मार्च 2020 साली महाबळेश्वरच्या एका गुहेत ही वटवाघुळं आढळून आली होती. त्यांच्यामध्ये निपाह नावाचा विषाणू असल्याची माहिती मिळत आहे. 2018 साली केरळमध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झालेलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या गुहेत आढळून आलेल्या वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, हा विषाणू कोरोनापेक्षाही भयावह आहे. 


भारतात यापूर्वी 2001मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्मिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाहचे 66 रूग्ण आढळले होते. त्यापैकी 45 रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. 2007मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


निपाह व्हायरसची लक्षणं 


ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.