जयपूर : लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी राजस्थान सरकारच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता बिकानेर प्रशासनाने व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरु केलं असून सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत, 45 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्सासाठी एका मोबाईल टीमची निर्मिती करण्यात आली आहे. 


या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने एक हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. या हेल्पलाईन नंबरच्या आधारे लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येऊ शकेल. यामध्ये किमान दहा लोकांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी ही मोबाईल व्हॅन त्या लोकांच्या घरी जाईल आणि त्यांचे लसीकरण पूर्ण करेल. या ड्राईव्ह सोबत एक मेडिकल स्टाफचीही नियुक्ती करण्यात आली आहे, जी लस घेणाऱ्या व्यक्तीचे लस घेतल्यानंतर काही वेळ ऑब्जर्वेशन करेल. 


बिकानेरमध्ये सध्याच्या घडीला 16 प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत. या आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टरांना सांगितलं आहे की ज्या लोकांना लस देण्यात आली आहे त्या लोकांच्या आरोग्याकडे काही काळापर्यंत लक्ष द्यावं. बिकानेर जिल्ह्यामधील 60 ते 65 टक्के लोकांचं आतापर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामध्ये  तीन लाख 69 हजार लोकांना लस देण्यात आली आहे. 


देशातील वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस द्याव्यात हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारकडून त्यावर मत मागवलं होतं. त्यावर केंद्र सरकारने सध्यातरी घरोघरी जाऊन लसीकरण करता येणार नाही असं सांगितलं होतं. 


महत्वाच्या बातम्या :