Christian Eriksen Collapsed : युरो कप - 2020 मधील एका सामन्यात एक असा क्षण आला ज्यावेळी सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. कोणाला काही कळण्यापूर्वीच सामना थांबवण्यात आला आणि वैद्यकीय पथकानं मैदानात धाव घेतली. चाहत्यांना आणि खेळाडूंना रडू कोसळलं. कारण त्यांचा लाडका खेळाडू दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियन एरिक्सन बेशुद्ध होऊन मैदानात कोसळला होता. 


11 जूनपासून फुलबॉल जगतातील मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'युरो कप - 2020' या स्पर्धेला सुरुवात झाली. शनिवारी फिनलँड विरुद्ध डेन्मार्क  (Denmark vs Finland) हा सामना सुरु होता. अन् अचानक सामना सुरु असतानाच डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलर मिडफील्डर ख्रिस्तियन एरिक्सन (Christian Eriksen collapses) अचानक मैदानात कोसळला. कोपनहेगन पार्केन स्टेडियममध्ये हा सामना शनिवारी फिनलँड आणि डेन्मार्क  (Denmark vs Finland) मध्ये खेळवण्यात आला होता. फर्स्ट हाफ संपण्यापूर्वी एरिक्सन खेळताना अचानक मैदानात बेशुद्ध पडला आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 



क्रिस्टियन एरिक्सन (Christian Eriksen) बेशुद्ध होऊन मैदानात कोसळल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि मैदानातील रेफरी अंथनी टेलर यांनी सामना थांबवून वैद्यकिय टीमला मैदानात तत्काळ बोलावलं. एरिक्सनला मैदानावरच सीपीआर देण्यात आला. तत्काळ उपचारानंतर एरिक्सनला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यूईएफएनं ट्वीट करुन दिलेल्या माहितीनुसार, एरिक्सनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. 


एरिक्सन बेशुद्ध पडल्यानंतर सामना त्वरित स्थगित करण्यात आला. काही वेळानं सामना पुन्हा सुरु झाला. आपला लाडका खेळाडू मैदानात अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्यामुळे चाहते हैराण होते. तसेच संपूर्ण मैदानात शांतता पसरली होती. काही चाहत्यांना रडूही अनावर झालं. एवढचं नाहीतर, डेन्मार्कच्या संघातील सर्व खेळाडूही रडू लागले. अशातच सध्या सोशल मीडियावर एरिक्सनच्या उत्तम प्रकृतीसाठी सर्व चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, कोरोना संकटात पार पडणाऱ्या या सामन्यासाठी पहिल्यांदाच 15000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.