नवी दिल्ली : कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी, कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने, राज्ये आणि केंद्र्शासित प्रदेशांसह श्रेणीबद्ध, तत्पर दृष्टीकोन स्वीकारत अनेक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. यांचा उच्च स्तरावर नियमित आढावा घेतला जात असून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. कोविड-19 ची गती संथ राखण्यात भारत तुलनेत सक्षम राहिला असून कोविड-19 शी संबंधित आकडेवारीवरून त्याचा प्रभाव आपल्याला पाहता येईल.
जागतिक आकडेवारीशी तुलना करता एक लाख लोकसंख्येमध्ये 62.3 रुग्ण आढळतात. तर भारतात हे प्रमाण एक लाख लोकसंख्येत केवळ 7.9 रुग्ण इतके आहे. त्याच प्रमाणे एक लाख लोकसंख्येत जागतिक स्तरावर सरासरी मृत्यू दर 4.2 आहे, तर भारत हे प्रमाण 0.2 आहे.
कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेले 15 देश पाहता त्यांची एकत्रित लोकसंख्या भारताएवढी आहे. परंतु या देशांमध्ये एकत्रितरीत्या भारताच्या 34 पट जास्त केसेस तर भारताच्या 83 पट जास्त मृत्यू झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
रुग्णांची वेळेवर दखल आणि वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे तुलनेत मृत्यू दर कमी राहिला आहे. वैद्यकीय व्यवस्थापन आणि रुग्ण बरे करण्यावर भर राहिल्यामुळे, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. 39.6 % पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 42,298 रुग्ण यातून बरे झाले आहेत. हा रोग बरा होणारा असून भारतात अमलात आणली जाणारी वैद्यकीय व्यवस्थापन पद्धती प्रभावी असल्याचे हे द्योतक आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांची माहिती पाहता, व्यवस्थापनाखाली असलेल्या सक्रीय रुग्णांपैकी 2.9 टक्के रुग्णांना ऑक्सिजन सहाय्याची आवश्यकताआहे, 3 टक्के सक्रीय रुग्णांना आयसीयू सहाय्याची तर 0.45 टक्के सक्रीय रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. कोविड समर्पित आरोग्य पायाभूत संरचना सुधारण्यावर भारत त्याचवेळी लक्ष केंद्रित करत आहे.