Corona New Variant : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये (Coronavirus Updates) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1300 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 140 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 7,605 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्ण संख्येत घट झाली होती. पण गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत संक्रमित कोरोना रुग्णांची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 4,46,99,418 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 


XBB.1.16 प्रकाराचे वाढते रुग्ण


गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना आणि व्हायरल फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. संथ झालेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा वेग पकडला आहे. कोरोना नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे कोविड (COVID-19) चा XBB.1.16 प्रकार असल्याचं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, XBB.1.16 प्रकाराचे आतापर्यंत एकूण 349 नमुने आढळले आहेत. नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही नवीन प्रकरणं आढळून आली आहेत.


नव्या व्हेरियंटची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात


भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortium (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, XBB.1.16 या प्रकाराची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 61 आणि गुजरातमध्ये 54 आढळली आहेत. XBB 1.16 व्हेरियंटचे दोन नमुने पहिल्यांदा जानेवारी महिन्यामध्ये सापडले होते. फेब्रुवारीमध्ये, XBB 1.16 व्हेरियंटचे 140 नमुने सापडले. तर, मार्चमध्ये आतापर्यंत XBB 1.16 प्रकाराचे  207 नमुने सापडले आहेत.


आरोग्य मंत्रालयानं काय म्हटलंय?


केंद्रीय आरोग्य सचिवांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जगात एका दिवसांत कोविडचे 94,000 नवीन रुग्ण आढळले आहेत. अजूनही कोरोना ही जागतिक महामारी संपलेली नाही कारण अद्यापही नवीन रुग्ण समोर येत आहेत. जगातील 19 टक्के रुग्ण अमेरिकेमध्ये, 12.6 टक्के रशियामधून आणि 1 टक्के रुग्ण भारतात आढळून आले आहेत. आरोग्य सचिवांनी सांगितलं की, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. 


अँटीबायोटीक आणि प्लाझ्मा थेरपी टाळण्याचा सल्ला


आरोग्य मंत्रालयानुसार, AIIMS, ICMR आणि कोविड (Covid-19) नॅशनल टास्क फोर्स (NTF) ची 'क्लिनिकल गाइडन्स प्रोटोकॉल' सुधारण्यासाठी 5 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत डॉक्टरांना अँटीबायोटीक आणि प्लाझ्मा थेरपीचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid-19 : कोरोना संसर्ग झाल्यास 'ही' औषधं घेऊ नका, प्लाझ्मा थेरपीही टाळा; आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना