Balasore Train Accident : ओडिशातील (Odisha) रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आणि 1000 हून अधिक जण जखमी झाले. अवघ्या काही सेकंदात होत्याच नव्हतं झालं. या अपघातासंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओडिशा अपघाताच्या अवघ्या काही सेकंदा आधीचा असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ अपघातग्रस्त ट्रेनमधील (Train Accident Video) असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.


अन् काही सेकंदात झालं होत्याच नव्हतं झालं


ओडिशा रेल्वे अपघाताचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सफाई कर्मचारी ट्रेनची साफसफाई करत असताना एक प्रवासी त्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर जोरदार हादरा बसतो आणि ट्रेनमध्ये अचानक सर्वकाही उलटंपालटं होतं. हा व्हायरल व्हिडीओ अपघाताच्या काही सेकंदापूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ :






व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?


ओडीशातील बालासोरच्या बहनगा येथे 2 जून रोजी झालेल्या तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अपघातग्रस्त कोरोमंडल ट्रेनच्या आतमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये सफाई कर्मचारी एसी कोचमध्ये फरशी पुसताना दिसत आहे, तेव्हाच हा अपघात होतो. यामुळे व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अचानक धक्का लागल्याने त्याचा तोल गेला. त्याचा फोन हातातून खाली पडतो.


ओडिशा रेल्वे अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल


या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्हिडीओ बनवणारा प्रवासी धक्का लागून खाली पडतो. तो खाली पडताच ट्रेनमध्ये अंधार होतो आणि मग प्रवासी ओरडू लागतात. या व्हिडीओ मागचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


ओडिशा रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू


ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. यापैकी 193 मृतदेह भुवनेश्वर येथील एम्समध्ये तर 94 मृतदेह बालासोर येथील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. भुवनेश्वरला आणलेल्या 110 मृतदेहांची ओळख पटली. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये 200 हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Odisha Train Accident : "आमचं कर्तव्य अजुनही संपलेलं नाही, अपघातातील बेपत्ता लोकांचा..."; अपघाताबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री भावूक