Child Vaccination : केंद्र सरकारने कॉर्बेवॅक्स (Corbevax) कोविड प्रतिबंधक लसीच्या पाच कोटी डोससाठी खरेदी ऑर्डर दिली आहे. या लसींचा साठा फेब्रुवारीच्या अखेरीस पोहोचेल. यामुळे कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत लस उपलब्धत झाल्याने लसीकरणाला चालना मिळेल. हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' (Biological E) कंपनी निर्मित असलेली 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) ही लस कोविडविरुद्ध 90 टक्के प्रभावी ठरण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सरकारने शाळा सुरु केल्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढे 15 वर्षाखालील गटाच्या लसीकरणासाठी सरकार कॉर्वेबॅक्स लसीचा वापर करु शकते असं सांगण्यात येत आहे.

कॉर्बेवॅक्स लसीला सध्या केवळ प्रौढांसाठीच्या वापरासाठी मंजूर देण्यात आली आहे. दरम्यान बायोलॉजिकल ईने अलीकडेच लसीच्या 5-12 वर्षे आणि 12-18 वर्षे वयोगटासाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोविड-19 साठी लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) च्या बैठकीत वैज्ञानिक तज्ज्ञांनी कॉर्बेवॅक्सच्या 12-18 वयोगटाच्या चाचणीच्या माहितीचे पुनरावलोकन केले. दरम्यान, कंपनीने अद्याप DCGI कडे कमी वयोगटातील मुलांच्या चाचण्यांमधून प्राप्त केलेली माहिती मंजुरीसाठी समाविष्ट केलेली नाही. सूत्रांनी असे सांगितले आहे की, एकदा NTAGI सदस्य माहितीवर समाधानी झाल्यानंतर आणि पुढे नियामक मंडळाकडून अंतिम मंजुरी मिळण्यास वेळ लागणार नाही.

सध्या, केवळ 15-17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या गटासाठी केवळ कोवॅक्सिन (Covaxin) लसीचे डोस देण्यात येत आहेत. मर्यादित उत्पादनामुळे कोवॅक्सिनचा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. प्रौढांमधील प्राथमिक लसीकरणासाठी तसेच त्याच लसीचे दोन डोस मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्यासाठी देखील कोवॅक्सिनचा वापर केला जात आहे.

आतापर्यंत 15-17 वर्षे वयोगटातील 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना म्हणजेच सुमारे 66 टक्के तरुणांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. यापैकी सुमारे 56 लाख तरुणांना त्यांचा दुसरा डोसही मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha