COP26 : ग्लासगो इथं सुरु असलेल्या हवामान बदलाविषयक COP26 या परिषदेत बोलताना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. 2070 सालापर्यंत नेट झिरो (Net Zero) म्हणजे शून्य कार्बनचे (Zero Carbon Emmission) लक्ष्य गाठणार असं भारताकडून जाहीर करण्यात आलं. म्हणजे 2070 सालापर्यंत भारत कार्बन न्यूट्रल देश बनणार आहे. भारताची ही भूमिका जगासाठी अत्यंत महत्वाची आहे, त्याचं अनेकांनी स्वागत केलं आहे.


कार्बन उत्सर्जनाचा विचार करता चीनकडून (27.2 टक्के) सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होतंय तर अमेरिका (14.6 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा (6.8 टक्के) कार्बन उत्सर्जनामध्ये तिसरा क्रमांक लागतोय. चीनने 2060 पर्यंत तर अमेरिकेने 2050 पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य गाठण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भारतानेही आपली भूमिका जाहीर करावी यासाठी मोठा दबाव होता. 


ग्लासगो परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी जगाला पंचामृत सूत्र देत असल्याचं सांगितलं. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते नेट झिरो. 


Climate Change : COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे?


नेट झिरो म्हणजे काय? 
आपल्या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होत असेल तितक्याच प्रमाणात विविध माध्यमातून कार्बनचे शोषण केलं जात असेल तर त्याला नेट झिरो किंवा शून्य कार्बन असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा देश जेवढं कार्बन उत्सर्जित करतोय तितकाच शोषून घेतोय. उत्सर्जित होणारा कार्बन वातावरणात मिसळत नाही, तो पुन्हा मातीमध्ये पोहोचवला जातो.   


सोप्या शब्दात सांगायचं तर त्या देशाकडून वातावरणात कोणतेही अतिरिक्त कार्बन मिसळणार नाही. जागतिक तापमानवाढीत त्या देशाचे योगदान हे शून्य असेल. त्यामुळे जागतिक तापमानवाढ तसेच प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही.


यंदाच्या COP 26 बैठकीचा अजेंडा काय? पॅरिस कराराची उद्दिष्ट्ये साध्य होणार का? 


नेट झिरोचे लक्ष्य गाठणं शक्य आहे का? 
नेट झिरोचे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला कार्बन सिंक निर्माण करावे लागणार आहे. म्हणजे अशा काही एरियाची निर्मिती करावी लागणार आहे, ज्यामध्ये उत्सर्जित होणारे कार्बन शोषून घेतलं जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घनदाट जंगलं तयार केली पाहिजेत, अनेक वृक्षांची लागवड केली पाहिजे. जसं अॅमेझॉनचं जंगल किंवा भारतातील पश्चिम घाट.


नेट झिरोचे लक्ष्य शक्य आहे का?  
नेट झिरोचे ध्येय अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. भूटान आणि सुरिनेम (दक्षिण अमेरिका) या दोन देशांनी आतापर्यंत नेट झिरो म्हणजे शून्य कार्बनचे ध्येय गाठलं आहे. भूटान तर कार्बन निगेटिव्ह देश आहे. 


भारत हा वेगाने प्रगती करणारा विकसनशील देश आहे. येत्या काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विकास होणार आहे. त्यामुळे येत्या काळात अधिक प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत 2070 सालापर्यंत नेट झिरोचे लक्ष्य गाठणं अवघड आहे. 


COP 26 : जंगलतोड संपवण्यासाठीच्या करारवर हस्ताक्षर करण्यास भारताचा नकार


न्यूक्लिअर एनर्जी हा पर्याय
भारत 2030 पर्यंत आपल्या कार्बन उत्सर्जनामध्ये 45 टक्क्यांची घट आणणार आहे. मग हे जर करायचं असेल तर केवळ न्यूक्लिअर पॉवर म्हणजे आण्विक उर्जा हाच मोठा पर्याय उपलब्ध आहे. न्यूक्लिअर पॉवर हा सर्वाधिक स्वच्छ पर्याय आहे. केवळ सौरउर्जा, पवन उर्जा किंवा हायड्रो एनर्जी यावर हे लक्ष्य गाठणं अशक्य आहे. 


भारतामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लॅंटला ठिकठिकाणी विरोध केला जातोय. यामध्ये अनेक एनजीओ आहेत ज्या लोकांच्या माध्यमातून आंदोलन करतात. आपल्या देशात या सर्वांशी चर्चा करणे, त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये खूप वेळ जातोय. 


भारतात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेपैकी 70 ते 80 टक्के उर्जा ही कोळश्यापासून निर्माण केली जाते. त्यामुळे देशातील प्रदूषणामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. कोळश्यापासून इतर उर्जेकडे शिफ्ट व्हायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता आहे. दुसरीकडे भारतातील जंगलाखालील भूभाग हा अत्यंत वेगाने कमी होताना दिसतोय. 


नरेंद्र मोदींनी नेट झिरोचे हे ध्येय गाठण्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना एक ट्रिलियन डॉलर्सची मदत करावी असं आवाहन केलं आहे.


COP 26 : पर्यावरणाच्या हानीसाठी विकसित देश जबाबदार, त्यांनी भारताला नुकसान भरपाई द्यावी; भारताची भूमिका


भविष्यात पंतप्रधान पदावर बसणाऱ्या व्यक्तीने हे लक्ष्य गाठण्यासाठी उचित पाऊलं उचलायला हवीत. हा एक असा विषय आहे की जिथं केवळ घोषणा करुन उपयोग नाही तर त्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे.


भारतासाठी नेट झिरोचे लक्ष्य गाठणं अत्यावश्यक आहे. कारण 2050 पर्यंत हवामान बदलाच्या प्रश्नामुळे 6 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होणार असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आपण हवामान बदलाच्या प्रश्नाला सहजरित्या घेणं बंद करायला हवं आणि त्यावर अधिक गंभीर होणं आवश्यक आहे. 


कोणता देश कधीपर्यंत नेट झिरोचे लक्ष्य गाठणार? 



  • चीन 2060

  • अमेरिका 2050 

  • अर्जेंटिना 2050

  • ब्राझिल 2060

  • कॅनडा 2050

  • फ्रान्स 2050

  • जपान 2050

  • ब्रिटन 2050

  • स्पेन 2050


हरित वायूच्या उत्सर्जनात 149 टक्यांची विक्रमी वाढ, जगाची चिंता वाढली; WMO च्या अहवालातून स्पष्ट