मुंबई : पंतप्रधान मोदींनी राबवलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सहकारी चळवळीला बसला असा आरोप नोटाबंदीला विरोध असलेल्या सर्वच पक्षांतील राजकीय नेते करत आहेत. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर रिझर्व बँकेनेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह सर्व छोट्या मोठ्या सहकारी पतसंस्थांना बंद करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीरकारण्यास मनाई केली होती. त्यामुळे सहकारावर नोटाबंदीने संक्रांत आल्याचा राजकीय नेत्यांचा आरोपही खरा वाटत होता. मात्र आता प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात सहकारी बँका आणि पतसंस्थात नोटाबंदीच्या काळात मोठे घोटाळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी रिझर्व बँकेला पाठवलेल्या अहवालात ही भिती व्यक्त करण्यात आलीय.
प्राप्तीकर विभागाच्या तपास पथकाने पहिल्या टप्प्यात जयपूर, राजकोट आणि पुण्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या हिशेबाची पडताळणी केली. त्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
अनेक सहकारी बँकाच्या बुक्समध्ये म्हणजे हिशेब पुस्तकात दाखवण्यात आलेल्या रू. 1000 आणि रू. 500 च्या नोटांमधील रक्कम आणि प्रत्यक्षातील बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात मोठी तफावत आढळून आलीय. प्राप्तीकर अधिकरांच्या तपास पथकाने सध्या फक्त तीनच शहरातील बँकांची तपासणी केली आहे, प्रत्यक्षात जर सर्वच सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या हिशेब पुस्तकांची छाननी केल्यास खूप मोठा घोटाळा उघड होऊ शकतो, असं प्राप्तीकर अधिकाऱ्यांना वाटतं.
एका सहकारी बँकेच्या शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवण्यात येत असलेली हजार-पाचशेच्या नोटांमधील रक्कम स्थानिक पोलिसांनी पकडल्यावर जेव्हा प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा ही बाब उघड झाली. बँकेच्या हिशेब पुस्तकात दाखवण्यात आलेली रक्कम आणि प्रत्यक्षातील रोकड यामध्ये तब्बल 100 कोटींपेक्षाही जास्त रक्कमेची तफावत आढळून आलीय.
म्हणजे त्या बँकेच्या खातेपुस्तकात हजार पाचशेच्या नोटांमधील रक्कम ही 242 कोटी रूपये असल्याची नोंद होती मात्र प्रत्यक्षात हजार पाचशेच्या नोटांमधील रोकड ही 100 कोटींपेक्षाही कमी भरली होती.
प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या या अहवालानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयानेही अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक सहकारी बँका आणि पतसंस्थात रातोरात बचत खाती उघडण्यात आली आणि त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हजार पाचशेच्या रकमा जमा करण्यात आल्या. त्यापैकी बहुसंख्य खात्यांना केवायसी म्हणजे खरोखरच खातं कुणाचं आहे, याचा तपशील देणारी कागदपत्रे जोडलेली नाहीत.