इन्फोसिसनं 9000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची चर्चा
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 11:49 AM (IST)
बंगळुरु : प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, आपण आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलेलं नसून त्यांच्यावर दुसऱ्या एका प्रोजेक्टची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती इन्फोसिसकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्यानं 8000 ते 9000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याची सध्या चर्चा आहे. पण या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आल्याचं इन्फोसिसचं म्हणणं आहे. सध्या आयटी क्षेत्रात इन्फोसिसबाबत अशी चर्चा असल्यानं तरुणांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. जागतिक मंदीच्या काळात अनेक कंपन्यांनी कामगारांमध्ये कपात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कामगार कपातीची चर्चा सुरु झाली आहे.