मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालेगावमधील एका सभेत राहुल गांधींचे पूर्वज हे गांधी नसून खान असल्याचा दावा केला होता. केवळ राजकारणासाठी त्यांनी गांधी हे आडनाव वापरून फायदा मिळवल्याचा दावाही त्यांनी केला होता. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या मते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे आजोबा आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पतींचे नाव (Indira Gandhi Husband) हे फिरोज गांधी नसून फिरोज खान होते. पण वस्तुस्थिती तपासल्यावर शरद पोंक्षे यांनी केलेले हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्ट होतंय. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमध्ये फॉरवर्ड होणाऱ्या या अशा मेसेजचे फॅक्ट चेक केल्यानंतर फिरोज गांधी (Feroze Gandhi) यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर येते.
फिरोज गांधी म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई आणि इंदिरा गांधी यांचे पती. एक स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि खासदार असलेल्या फिरोज गांधी यांनी या नात्यांची पर्वा न करता अनेकदा संसदेत नेहरूंच्या धोरणांवर ताशेरे ओढले. एवढंच काय तर त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिला मोठा घोटाळा (India's First Scam) उघडकीस आणला आणि त्यामुळे देशाचे तत्कालीन अर्थमंत्री आणि नेहरूंचे खास मित्र टीटी कृष्णमाचारी (T. T. Krishnamachari) यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Who Was Feroze Gandhi: कोण होते फिरोज गांधी? त्यांना गांधी हे आडनाव कसे पडले?
फिरोज जहांगिर घांडी (Feroze Jehangir Ghandy) यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगिर फरदून घांडी असं होतं (त्यांचे मूळ आडनाव हे गांधी नसून घांडी असं होतं). त्यांचे वडील हे मरिन इंजिनिअर म्हणून काम करायचे. फिरोज गांधी यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर, 1920 च्या दरम्यान ते त्यांच्या आईसोबत अलाहाबादला राहायला आले. 1930 सालामध्ये त्यांची भेट इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू (Kamla Nehru) यांच्यासोबत झाली होती.
महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा, आडनाव गांधी असं केलं
फिरोज यांनी ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यामागे महात्मा गांधी (Mahatma Ganddhi) यांची प्रेरणा होती. त्यांच्या प्रभावामुळेच फिरोज यांनी त्यांचे Ghandy आडनाव बदलून ते Gandhi म्हणजे गांधी असं केलं. 1930 साली, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत त्यांना अलाहाबादमध्ये 19 महिन्यांचा कारावास भोगावा लागला होता. 1932 च्या काळात त्यांनी नेहरूंच्या सोबत जवळून काम केलं.
फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांनी विवाह करण्याचं ठरवलं. त्यांच्या या विवाहाला पंडित नेहरूंचा विरोध होता. पण महात्मा गांधींनी मध्यस्ती केली आणि मार्च 1942 मध्ये त्यांनी विवाह केला.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळी फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी हे त्यांच्या दोन मुलांसह अलाहाबादला स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेल्या नॅशनल हेरॉल्ड (The National Herald) या वृत्तपत्राचे ते व्यवस्थापकीय संचालक झाले.
India’s First Scam Mundhra Scandal : मुंध्रा घोटाळा उघड
1952 साली देशात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. व्यवसायाने पत्रकार असलेल्या फिरोज गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी संसदेत काँग्रेस सरकारसमोर विरोधक नव्हता. पण, जेव्हा-जेव्हा फिरोज गांधी नेहरूंच्या धोरणांशी असहमत असायचे, तेव्हा ते सरकार आणि काँग्रेसविरोधात आवाज उठवत असत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 1958 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारतातील पहिले भ्रष्टाचार प्रकरण असलेल्या 'मुंध्रा घोटाळ्या'वर (India’s First Big Financial Scam Mundhra Scandal) आवाज उठवला होता.
कोलकात्याचे उद्योगपती हरिदास मुंध्रा (Haridas Mundhra) यांच्या अडचणीत असलेल्या सहा कंपन्यांमध्ये, 1957 साली एलआयसीने (LIC) जवळपास 1.27 कोटी गुंतवले. एलआयसी सोबत कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. फिरोज गांधी यांनी यावर संसदेत आवाज उठवला.
अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
अर्थमंत्री टीटी कृष्णामाचारी आणि अर्थखात्याच्या सचिवांनी एलआयसीवर मुंध्रा यांच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी दबाब आणला असल्याचा आरोप करत फिरोज गांधी यांनी संसदेत पुरावे सादर केले. तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यावर स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. हे प्रकरण इतके वाढले की या प्रकरणात पंडित जवाहरलाल नेहरूंचेही नाव पुढे येऊ लागले. त्यामुळे सासरे आणि जावई यांच्यातील संबंधही बिघडले होते.
पुढे पं. नेहरूंनी याची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम सी छागला यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. लोकांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एचडीएफसी बँकेचे संस्थापक हसमुख ठाकोरदास पारेख यांनी आयोगासमोर साक्ष देताना सांगितले की, हरिदास मुंध्रा यांनी या कंपन्यांचे शेअर्स चढ्या भावाने विकून नफा कमावला. यामुळे या कंपन्यांचे एलआयसीने खरेदी केलेल्या शेअर्सचे 50 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर फेब्रुवारी 1958 मध्ये टीटी कृष्णमाचारी यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच उद्योगपती मुंध्रा यांना 22 वर्षे तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
पत्रकारांसाठी मोठं काम
फिरोज गांधी यांनी मुंध्रा घोटाळा उघडकीस आणण्यापूर्वी दालमिया जैन समूहातील आर्थिक अनियमितताही उघड केली होती. त्यांच्या डीजे ग्रुपमधील आर्थिक अनियमिततेमुळे आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. याशिवाय त्यांनी संसदेत खाजगी सदस्य विधेयक मांडले जेणेकरून कोणताही पत्रकार संसदेच्या कामकाजाचे वार्तांकन करू शकतील. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यानंतर इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. फिरोज गांधींचा स्पष्टवक्तेपणा काँग्रेसमधील अनेकांना आवडला नाही. नंतर इंदिरा गांधी त्यांच्या वडिलांच्या राजकीय जीवनात गुंतत गेल्या आणि फिरोज गांधी यांच्यापासून दूर होत गेल्या.
इंदिरा गांधींना फॅसिस्ट म्हटलं
फिरोज गांधी त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांच्या राजकीय विचारसरणीशीही असहमत होते. लोकशाही मूल्ये आणि संघराज्यवादाचे समर्थन करणाऱ्या फिरोज गांधींना इंदिरा गांधीं या हुकूमशाही वृत्तीच्या असल्याचं वाटत होतं. त्यामुळे या दोघांमधील अंतर वाढत गेले.
केंद्रातील जवाहरलाल नेहरूं सरकारने 1959 मध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या केरळमधील कम्युनिस्ट सरकार (Kerala First Communist Government) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दोघांमधील कटुता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यावेळी इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. केरळमध्ये नंबुदिरीपाद सरकार (EMS Namboodiripad Government) सत्तेत होतं आणि त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली होती. याला मोठा विरोध झाला आणि केंद्राने त्यांचे सरकार बरखास्त केले.
नाश्त्याच्या टेबलवर वाद
स्वीडिश पत्रकार बर्टील फॉक यांनी त्यांच्या 'फिरोज द फॉरगॉटन गांधी' या पुस्तकात लिहिले आहे की, पंडित नेहरूंच्या तीन मूर्ती निवासस्थानी नाश्ता करताना इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात केरळच्या मुद्द्यावरून वाद झाला. केंद्राने केरळ सरकार बरखास्त करणे हे चुकीचं असल्याचं फिरोज गांधी यांचे म्हणणे, पण इंदिरा गांधी यांना ते मान्य नव्हते. त्यावेळी फिरोज गांधी यांनी इंदिरा गांधी यांना फॅसिस्ट असल्याचं म्हटलं. त्यानंतर इंदिरा गांधी रागाच्या भरात टेबलवरून उठून निघून गेल्या. दरम्यान, पंडित नेहरू हे त्या ठिकाणी होते आणि ते हा वाद शांतपणे पाहत होते.
कसे झाले फिरोज गांधींचे अंतिम संस्कार?
फिरोज गांधी यांचे 8 सप्टेंबर 1960 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गीता, रामायण, कुराण आणि बायबलमधील उतारे वाचण्यात आले. पारशी धर्मगुरूंनीही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली. हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. राजीव गांधींनी फिरोज गांधी यांना मुखाग्नी दिली आणि त्यांच्या अस्थी गंगेत सोडण्यात आल्या.
ही बातमी वाचा: